सांगली : महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला शनिवारी धार चढली. शनिवारी दुसऱ्या दिवशी कोल्हापूर रस्त्यावरील खोक्यांच्या अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 35 मीटर रुंदीने रस्त्याची हद्द निश्चित केली आहे. या हद्दीतील सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेने शुक्रवारपासून सुरू केली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली. आखाड्याच्या संरक्षक भिंतीजवळील खोकी हटवण्यास सुरुवात करण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.
अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सहायक आयुक्त सचिन सागावकर तसेच स्वच्छता निरीक्षकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या कारवाईसाठी महावितरण, वाहतूक पोलिस आणि बांधकाम विभागाने सहकार्य केले. खोक्यांची विद्युत जोडणी तोडण्यात आली. काही खोक्यांवर महापालिकेने जेसीबी चालवला. यावेळी खोकीधारकांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी वादावादीचा प्रकार घडला. दरम्यान, कुस्ती आखाडा परिसरातील सर्व खोकीधारकांनी खोकी स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, काही खोकी कुस्ती आखाडा परिसरात स्थलांतरित करा, अशी आग्रही मागणी खोकीधारकांनी केली. त्यानंतर माजी नगरसेवक रणजितसिंह सावर्डेकर व काही कुस्तीपटू हे कुस्ती आखाड्याच्या ठिकाणी आले. कुस्ती आखाड्यात खोक्यांचे पुनर्वसन होऊ नये, अशी मागणी केली. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर रस्त्याचे 35 मीटरने रुंदीकरण व्हावे, अशी मागणी केली.
मटक्याचे खोके केले उद्ध्वस्त
कुस्ती आखाड्याजवळील एका खोक्यात मटका घेतला जात होता. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या ते निदर्शनास येताच त्यांनी हे खोके तातडीने उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जेसीबी चालवून खोके तोडण्यात आले. परवानाधारक खोक्यात अवैध धंदे दिसून आल्यास खोक्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असा इशारा उपायुक्त पाटील यांनी दिला.