सांगली : महापालिका कर्मचार्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी निघणार आहे. ठाणेदारांची उचलबांगडी आणि उपद्रवींचा बंदोबस्त होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. चार वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणार्या कर्मचार्यांची बदली होणार आहे. प्रशासकीय बदल्यांबरोबरच विनंती बदल्याही होणार आहेत.
महापालिकेच्या प्रत्येक विभागातील मंजूर पदे, रिक्त पदे पाहून त्या विभागास लागणारी कर्मचारी संख्या निश्चित करणे, कर्मचारीनिहाय कामाचे नियोजन करणे, सध्या काम करत असलेल्या विभागातील कर्मचारी त्या कामास योग्य आहे का, किंवा त्याच्या कामाचे कौशल्य व शैक्षणिक अर्हता याचा अभ्यास करून योग्य ठिकाणी नेमणूक करणे, गेल्या चार वर्षात एकाच विभागात काम करत असलेल्या कर्मचार्यांची माहिती घेऊन त्यामुळे नुकसान होत आहे किंवा नाही, याचा अभ्यास करून कर्मचार्यांच्या पारदर्शक बदलीचे धोरण निश्चित करणे, कर्मचारी कामाचे मूल्यांकन करून प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण करणे, एखाद्या विभागात जादा कर्मचारी असतील तर त्यांच्या कौशल्यानुसार योग्य विभागात बदली करणे, कर्मचारी तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, डिजिटल कार्यप्रणाली विकसित करणे, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते. त्यानुसार उपायुक्त अश्विनी पाटील यांनी अहवाल तयार केला आहे. दरम्यान, महापालिकेत कर्मचारी बदल्यांची चर्चा जोरात आहे. चार वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांच्या बदलीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, एकाच विभागात, एकाच टेबलवर काम करून हितसंबंध निर्माण केलेल्या ‘ठाणेदार’ कर्मचार्यांच्या बदलीचेही संकेत मिळत आहेत. बदली आदेश सोमवारी अथवा मंगळवारी निघतील, असे सांगण्यात आले. महापालिकेच्या स्थापनेपासून अनेक कर्मचारी एकाच विभागात काम करत आहेत. त्यातील काही कर्मचार्यांनी बदली रोखण्यासाठी राजकीय दबाव आणण्याची धडपड सुरू केली आहे.