सांगली : घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना म्हाडाच्या उपविभागीय कार्यालयातील शिपाई विजय यशवंत गंगाधर (वय 48, रा. साखराळे, ता. वाळवा) याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात ही कारवाई केली.
तक्रारदारांनी म्हाडाकडून घर खरेदी केले होते. या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी म्हाडाच्या सांगली उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. तक्रारदारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथे कार्यरत शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदारांकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. 15 रोजी तक्रार अर्ज केला.
तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. यावेळी संबंधिताने एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावला. शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यास तत्काळ पकडण्यात आले. संजयनगर पोलिस ठाण्यात शिपाई विजय गंगाधर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्यासह पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.