विटा : विटा ते कुंडल रस्त्यावर खंबाळे (भा) गावाच्या हद्दीत दोन दुचाकींचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. मृतांत विट्यातील माहेश्वरी आनंदराव पाटील (वय 26) आणि बलवडी (भा) येथील विनायक दादासाो पाटील (40) यांचा समावेश आहे; तर सविता माणिक भगत (50) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात काल, शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी विट्यातील माहेश्वरी पाटील या आई सविता भगत (वय 50) यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच 10 इ.एन. 4285) विट्याकडून आळसंद मार्गे कळंबीकडे निघाल्या होत्या, तर विनायक पाटील हे दुचाकीवरून (क्र.एमएच 12 सी. एस. 1864) बलवडीकडून विट्याकडे येत होते. विटा ते कुंडल रस्त्यावर खंबाळे (भा) गावाच्या हद्दीत चक्रधारी सूतगिरणीसमोरच्या उताराच्या रस्त्यावर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातामध्ये माहेश्वरी पाटील आणि विनायक पाटील या दोन्ही दुचाकींवरील चालकांच्या डोक्याला आणि हाताला तसेच छातीला जबर मार बसला. त्यामुळे ते दोघेही बेशुद्ध पडले, तर माहेश्वरी पाटील यांच्या मागे बसलेल्या सविता भगत यांनाही मोठी दुखापत झाली. काही वेळानंतर तेथून जाणार्या काही लोकांनी विटा ग्रामीण रुग्णालयाकडे दूरध्वनी करून माहिती दिली. तसेच विटा पोलिस ठाण्याकडेही संपर्क साधून घटनेची माहिती दिली. विटा ग्रामीण रुग्णालयात माहेश्वरी पाटील आणि विनायक पाटील यांना दाखल केले असता, उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पंचनामा आणि जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.