दिलीप जाधव
तासगाव : ज्या तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात नाहीत, अशा सर्व तालुक्यांमध्ये स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा शासननिर्णय झालेला आहे. त्यानुसार राज्य पणन संचालकांनी कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने 15 दिवसाच्या आत स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करावा, अशी नोटीस जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुनील चव्हाण यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली आहे. राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडूनही अभिप्राय मागविला आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कवठेमहांकाळ आणि जत येथे दुय्यम बाजार (उपबाजार) आवार कार्यरत आहेत. या दोन्ही ठिकाणी शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दि. 17 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार लवकरच जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन होईल, असे संकेत मिळत आहेत.
जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी बाजार समितीला दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुकास्तरावर नवीन कृषी उत्पन्न बाजर समिती स्थापन करण्याचा शासननिर्णय दि. 17 एप्रिल 2025 रोजी झालेला आहे. सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ आणि जत या दोन तालुक्यांत स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात नसल्याने कवठेमहांकाळ व जत तालुक्यांचा सदर शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे कवठेमहांकाळ आणि जत येथे दुय्यम बाजार आवार कार्यरत आहे.
कवठेमहांकाळ येथे विठ्ठल (दाजी) पाटील दुय्यम बाजार आवाराचे कवठेमहांकाळ येथे 7.75 हेक्टर क्षेत्र आहे, तर ढालगाव दुय्यम बाजार आवाराचे ढालगाव येथे 3.44 हेक्टर क्षेत्र आहे. या जागेत कार्यालयीन इमारत, कर्मचारी निवास, सेसनाका, गोडावून, व्यापारी गाळे, प्रवेशद्वार, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लोडींग अनलोडींग कट्टा, रस्ते, गटारी, पाणी व्यवस्था, पुरुष व महिला स्वच्छतागृह, गोडावून, सेल हॉल, शॉपिंग सेंटर, शेतकरी निवास, वॉटर एटीएम, वॉटर एटीएम कट्टा, शॉपिंग सेंटर पेव्हिंग ब्लॉक, शॉपिंग सेंटर नवीन गाळा, शेतकरी भवन पत्राशेड, वजन-काटा केबिन, पाणी व्यवस्था, दगडी संरक्षक भिंत सेस नाका, मुख्य प्रवेशद्वार, तारेचे संरक्षक कंपाऊंड, रस्ते - गटारी, पाणी व्यवथा, हेदर कट्टे, दगडी संरक्षक भिंत इतक्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.
जत येथे श्रीमंत विजयश्रीराजे डफळे दुय्यम बाजार आवाराचे 6.40 हेक्टर क्षेत्र असून जनावरे बाजाराचे 6 हेक्टर इतके क्षेत्र आहे. तसेच बी. आर. शिंदे (काका) दुय्यम बाजार आवार माडग्याळ याचे 4.08 हेक्टर क्षेत्र असून दुय्यम बाजार आवार उमदीचे 3.20 हेक्टर इतके क्षेत्र आहे. कार्यालयीन इमारत, कर्मचारी निवास, शेतकरी निवास, गोडावून, स्टोअर रूम, व्यापारी संकुल कॅटल शेड, सेस नाका, विश्रामगृह, धान्य गोडावून, सभागृह, सार्वजनिक कट्टा, रस्ते, गटारी, प्रवेशद्वार, सरफेस ड्रेनेज, कंपाऊंड भिंत दगडी हेटर, गार्डन बॅचेस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रीलींग, बी. आर. काका पुतळा, ट्रीगार्ड, पाण्याची टाकी, पाणी व्यवस्था, धान्य चाळण गोदाम व मशिनरी, फळे व भाजीपाला कट्टा, वजन-काटा, हमाल व्यापारी निवारा शेड, बेदाणा शेड जनावरे चढविणे-उतरविणे कट्टा, ट्रेडर्स शॉप (गाळे), गोडावून, डाळिंब सेस हॉल, गाळे इतक्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.
या पार्श्वभूमीवर जत व कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबत सांगली बाजार समितीने 15 दिवसात अभिप्राय सादर करावा, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आता स्वतंत्र बाजार समिती स्थापनेच्या प्रक्रियेला औपचारिक गती मिळेल, असे संकेत मिळत आहेत.