स्वप्निल पाटील
सांगली : मिरजेतील निखिल कलगुटगी याच्या खुनाला आता महिना लोटला. खुनात 2 अल्पवयीन गुन्हेगारांसह 9 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. खुनातील सूत्रधार मात्र फरार म्हणजे मोकाटच आहे. त्यांचा शोध पोलिसांना लागत नाही? की लावायचा नाही? याप्रकरणी पोलिस अधिकार्यांची बदली केली? मग साध्य काय केले? गुन्हेगारांना पकडू नये यासाठी पोलिसांवरच दबाव आहे का? असाही सवाल दबक्या आवाजात पोलिस मुख्यालयासह पोलिस दलात उपस्थित केला जात आहे.
निखिल कलगुटगी याचा 28 सप्टेंबर रोजी गणेश तलाव येथे धारदार हत्यारांनी वार करून खून केला होता. याप्रकरणी त्याच्या मारेकर्यांना पोलिसांनी अटक केली; खुनातील मूख्य सूत्रधार कोण? याचा तपास करीत असताना काही जणांची नावे समोर आली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. पण खून होऊन महिना झाला तरी मूख्य सूत्रधार फरार आहेत. खुनानंतर याचा तपास जलद गतीने करण्यात आला. मारेकर्यांना धडाधड बेड्या ठोकल्या. पण सुरुवातीला जी गती या तपासात होता, ती नंतर का राहिली नाही, अशी चर्चा आता पोलिस दलात सुरू आहे. आदेश मिळूदे... त्यांची चमडी लोळवतो... असेही काही खाकीची जाण असणारे पोलिस म्हणतात. मग त्यांना आदेश कोण देत नाही? सूत्रधारांना न पकडण्याचे नेमके आदेश कोणाचे? याचाही शोध लागणे आता गरजेचे आहे.
निखिल कलगुटगी याचा एका पक्षात प्रवेश होणार होता. पक्षप्रवेशादिवशी तो रॅलीही काढणार होता. त्याच्या आदल्या दिवशी त्याचा घात झाला. गणेश तलाव येथे तो गेला असता दबा धरून बसलेल्या मारेकर्यांनी धारदार हत्यारांनी त्याच्यावर हल्ला चढविला.खून होण्यापूर्वी दोन-तीन महिन्यांपूर्वी निखिल याचा भाचा रोहन कलगुटगी याच्यावर गोळीबार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून तो वाचला होता. त्यानंतर निखिल याचा संशयितांनी खून केला होता. आता हा खून कोणत्या कारणातून झाला हे सर्वश्रुत आहे. कोणी केला हेही सर्वांना माहीत आहे, असे बोलले जाते. पोलिसांनी धाडस केल्यास सूत्रधारांना बेड्या ठोकण्यास वेळ लागणार नाही.
जिल्ह्यात सातत्याने मुडदे पडत आहेत. अर्थात यामध्ये वैयक्तिक वादातून खुनाची संख्या जास्त असली तरी खून ते खूनच. आता हळूहळू टोळीयुद्धानेही डोके वर काढले आहे. जिल्ह्यात दिवसाढवळ्या मुडदे पडत असतील, तर पोलिसांचा धाक कमी झाला आहे का? पोलिसांची गस्त कमी झाली आहे का? तसेच निखिल कलगुटगी खूनप्रकरणी पोलिसांनी पुन्हा जोमाने काम करून सूत्रधारांना बेड्या ठोकल्या तरच सर्वसामान्यांचा खाकीवरील विश्वास बळावेल.
मिरजेत अनेक कर्तबगार अधिकारी होऊन गेले. उपअधीक्षक अशोक दुधे, दिगंबर प्रधान, विश्वास पांढरे, दीपक देवराज आणि धीरज पाटील तर पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून बाजीराव पाटील, सुरेश पवार, रणजित धुरे, प्रकाश वेंगुर्लेकर, राजेंद्र कुंटे, राजू ताशीलदार, संजीव झाडे यांनी मिरजेत काळ गाजवला आहे. आता नुकतीच बदली झालेले किरण रासकर यांनीही 10 महिन्यांत गुन्हेगारांवर वचक बसवला होता.
नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे नाशिक पोलिसांनी सिद्ध करून दाखवले आहे. साधा हल्ल्याचा जरी प्रयत्न केला तरी नाशिक पोलिसांनी त्यांची धिंड काढण्यास सुरुवात केली आहे. सांगलीत दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. कारवाई होते, हल्लेखोरांना अटक होते. पण त्यांची धिंड निघाली पाहिजे. त्यांची सामान्य नागरिकांच्या मनात असणारी दहशत पोलिसांनी मोडीत काढली पाहिजे. गुन्हेगारांना फरफटत नेल्याशिवाय पोलिसांचा वचक राहणार नाही. नाशिक पोलिसांनी जे केले ते आता सांगली पोलिसांनीही करणे गरजेचे आहे.
सांगली जिल्हा हा संवेदनक्षम आहे. मग या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणार्या अधिकार्यांना बदलीला का सामोरे जावे लागते? एखाद्या प्रकरणात चांगले काम करणे, गुन्हेगारांचा बीमोड करणे हा पोलिस अधिकार्यांचा गुन्हा असेल, अन् त्याची शिक्षा म्हणून त्यांना मुख्यालयात धाडले जात असेल, तर पोलिस काय कामाचे? बदल्यांच्या प्रकाराने अधिकार्यांचे तसेच कर्मचार्यांचे प्रचंड मानसिक खच्चीकरण झाले आहे. आता तरी काम करणार्या अधिकार्यांना, कर्मचार्यांना मोकळीक द्या, तरच खाकीची आब राखली जाईल.