सांगली : भारताचा क्रिकेट सामना मोठ्या स्क्रीनवर पाहतोय याचा चेहर्यावर आनंद अन् हातात तिरंगा घेऊन जल्लोष करीत विविध शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थिनींनी रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या महिला विश्वचषक क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला.
विद्यार्थी अवस्थेत खेळाचे महत्त्व कळावे, मुलींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सामना पाहण्यासाठी जिल्हा परिषदेमधील वसंतदादा पाटील सभागृहामध्ये मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. काही विद्यार्थिंनी शाळेच्या, तर काहीजण भारताची जर्सी घालून आल्या होत्या. भारतीय संघाने चौकार आणि षटकार मारल्यानंतर सभागृह टाळ्यांंनी दणाणून सोडले होते. तिरंगा उंचावत मुलींनी भारतीय संघाला चिअरअप केले. भारतीय संघामध्ये सांगलीत सराव करणारी भारताची उपकर्णधार स्मृती मानधना ही खेळत होती. त्यामुळे ही सांगलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, नरेंद्र माळी आदी उपस्थित होते.
खेळातून आज करिअर करण्याची मोठी संधी आहे. मात्र याकडे अनेकजण गांभीर्याने बघत नाहीत. खेळाबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी, विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., सांगली