सांगली : महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणार्या नागरिक आणि व्यावसायिकांबाबत आता महापालिकेने अत्यंत कठोर धोरण अवलंबले आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास कठोर दंडात्मक कारवाई होणार आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर शेअर केले जाणार आहे.
उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार महानगरपालिका क्षेत्रात विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक कचरा उघड्यावर टाकणार्यांवर थेट कारवाई करणार आहे. या पथकाकडून संबंधित व्यक्तींचे फोटोशूट व व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. चित्रीकरणानंतर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सार्वजनिक नामुष्की टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, कारण चित्रीकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील शेअर केले जाणार आहेत, असे म्हटले आहे. स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी व अतुल आठवले हे त्या पथकाचे सनियंत्रण करत आहेत. स्वच्छता निरीक्षक, भाग मुकादम व कर्मचारी यांचा पथकात समावेश आहे. मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर म्हणाले, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करा. दंडात्मक कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका.