हरिपूर : सांगली-हरिपूर रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ असलेल्या ओघळीमधील दुर्गंधीमुळे 45 वर्षांपासून येथील नागरिक दुर्गंधी भोगत आहेत. याबाबत दै.‘पुढारी’ने आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सोमवारपासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची तात्पुरती का असेना, दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.
येथील खचत जाणारा रस्ता आणि जुन्या ओघळीतून येणारी असह्य दुर्गंधी हा प्रश्न परिसरातील नागरिकांसाठी वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरत आला आहे. पाटणे प्लॉट परिसरातील ओहळाच्या बाजूचा रस्ता सातत्याने खचत चालला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचार्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. यासोबतच, उघड्या नाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथील रहिवाशांनी अनेक वर्षे प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, मात्र त्यांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.
ओघळीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेले काम चांगल्या दर्जाचे आणि टिकाऊ व्हावे, ही केवळ मलमपट्टी न ठरता, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा. अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
खासगी जागेचा मोबदला देऊन प्रश्न कायमचा सोडवावा
या समस्येचे मूळ येथील खासगी जागेतून जाणार्या ओघळीमध्ये आहे. ही ओघळ पूर्णपणे पक्की बांधून त्याचा प्रश्न कायमचा निकाली काढणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी जागा मालकांना योग्य मोबदला मिळणेही महत्त्वाचे आहे. शासनाने जागा मालकांना योग्य मोबदला देऊन जागा हस्तांतरित करून घेतल्यास हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ डागडुजी न करता, हा प्रश्न कायमचा निकालात काढून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. प्रभाग क्र. 14 मध्ये होणारा दुर्गंधी व इतर त्रास महापालिकेने दूरकरून सहकार्य करावे. वेळच्यावेळी कचरा उठाव करावा. पाणी थांबणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. औषध फवारणी वेळच्यावेळी करण्यात यावी.- सुब्राव मद्रासी, माजी नगरसेवक