सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांबाबत जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या आरक्षणावर आलेल्या 73 हरकतींबाबत निर्णय घेऊन अंतिम आरक्षण घोषणा आज पुणे विभागीय आयुक्त करतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद गट व गणनिहाय अंतिम मतदार यादीही आजच जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 गट असून दहा तालुक्यांंमध्ये मिळून 122 पंचायत समिती गण आहेत. या सर्वांसाठी काही दिवसांपूर्वीच आरक्षण काढण्यात आले आहे. त्यावर हरकती दाखल झाल्या आहेत. आरक्षणाबाबत जिल्ह्यात एकूण 73 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक हरकती या मिरज तालुक्यातील आहेत. त्याशिवाय तासगाव तालुक्यातीलही काही हरकती आहेत. या सर्वांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार आहेत. या निर्णयासह सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची मतदार यादीही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. वाढीव मुदतही संपत असुन यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारीच अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादीबाबत एकूण 56 हरकती आल्या होत्या, ज्या - त्या तालुक्यातील हरकतींवर तेथील तहसीलदारांनी निर्णय घेतलेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका, अशा निवडणुका लागतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र रविवारपर्यंत निवडणुकीची कोणतीच घोषणा झाली नाही. मात्र सोमवारी किंवा मंगळवारी घोषणा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र इच्छुकांच्या नजरा निवडणूक कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.