सांगली : महापालिकेत कनिष्ठ लिपिक (आरोग्य) या पदाचे खोटे नियुक्तीपत्र देऊन येथील खणभागमधील तरुणाची 3.40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पदावर हजर करून घेण्याच्या आदेशावर अतिरिक्त आयुक्तांची, तर कर्मचारी ओळखपत्रावर आयुक्तांची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महापालिकेने स्वत: पुढाकार घेऊन दिनेश पुजारी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पुजारी याने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) व तासगाव येथील अन्य दोघांना खोटे नियुक्तीपत्र दिल्याची माहितीही समोर आली आहे.
येथील खणभागमधील बावडेकर गल्लीतील वैभव रावसाहेब दानोळे या तरुणास संशयित दिनेश पुजारी याने ‘माझे आयुक्तांशी संबंध असून भरती प्रक्रियेतून नियुक्ती करून देतो’, असे सांगून टप्प्या-टप्प्याने 3.40 लाख रुपये घेतले आहेत. या रकमेच्या बदल्यात पुजारी याने दानोळे यांना कनिष्ठ लिपिक पदाचा बोगस नियुक्ती आदेश तसेच महापालिकेचे खोटे ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे.
वैभव दानोळे यास महापालिकेमध्ये ‘कनिष्ठ लिपिक’ पदावर हजर करून घेण्याबाबत दिलेल्या आदेशावर दि. 30 सप्टेंबर 2025 अशी तारीख आहे. या आदेशावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची स्वाक्षरी नमूद आहे, तसेच वैभव दानोळे यास कनिष्ठ लिपिक आरोग्य विभागाच्या नावे महानगरपालिकेचे ओळखपत्र दिले. त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी नमूद आहे. वैभव दानोळे यांच्या नावे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 35 हजार रुपयांची महानगरपालिकेचे नाव नमूद असलेली पावती केल्याचे दिसून आले आहे.
याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांनी दानोळे यांची समक्ष चौकशी केली असता दानोळे यांनी त्यांच्या परिचयाच्या दिनेश पुजारी याने नियुक्ती करून देतो, म्हणून 3.40 लाख रुपये घेतल्याचे सांगितले. याशिवाय पुजारी याने नृसिंहवाडी व तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही नियुक्ती पत्र दिले असल्याचे सांगितले. बोगस नियुक्तीचा प्रकार समोर येताच आयुक्त सत्यम गांधी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक आयुक्त विनायक शिंदे यांनी दिनेश पुजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.