सांगली : महापालिका स्वच्छता कर्मचार्यांनी दिवाळी सणामध्ये रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत 135 टन कचरा आणि तीन टन निर्माल्य संकलित करून 35 ट्रकद्वारे या कचर्याची विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये सुमारे अकराशे कर्मचारी सहभागी झाले होते. ऐन दिवाळीमध्ये संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवल्याबद्दल नागरिकांकडून प्रशंसा होत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. कचर्याचे प्रमाणही वाढले होते. विशेष करून लक्ष्मी पूजनादिवशी फटाके वाजवण्यात आल्याने फटक्याच्या कचरा वाढला होता. त्याचबरोबर पूजेचे साहित्य आणि हार तुरे, फुले असे निर्माल्यामुळे रस्त्यावरील कचर्यात लक्षणीय भर पडली होती.
उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी आदींच्या मार्गदर्शनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दीपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर लक्ष देण्यात आले होते. 21 ते 23 ऑक्टोबररोजी रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अकराशे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत गोळा करण्यात आलेला कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेण्यात आला. सांगली, मिरज शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना दुसर्या दिवशी पहाटेपासून स्वच्छ रस्ते पाहाण्यास मिळाली. मॉर्निग वॉक करणार्या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या विशेष स्वच्छता मोहिमेची प्रशंसा केली.