जत : शहरातील मधला पारधी तांडा येथे पोलिस पथकावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणत पथकातील अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. तसेच शासकीय वाहनाचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी जत पोलिसांनी नऊ संशयितांसह 30 ते 40 अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल अच्युतराव माने यांनी जत पोलिसात दिली आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार जत पोलिस पथक मधला पारधी तांडा येथे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत होते.
यादरम्यान आरोपी धनंजय दीपक चव्हाण मिळून आला. मात्र त्याला घेऊन जात असताना त्याचे वडील दीपक चव्हाण यांनी आरडाओरड करून जमाव जमवला आणि पोलिस पथकाला घेरले, धक्काबुक्की केली. यावेळी जिजाबाई चव्हाण हिने अंमलदार अच्युतराव माने यांना हाताने मारहाण केली. तसेच राकेश अप्पू काळे आणि विशाल राजेश काळे यांनी शासकीय वाहन (क्रमांक एमएच 10 2423) वर दगडफेक करून समोरील काच व बाजूचा आरसा फोडला. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी जत पोलिसांनी बसवराज चव्हाण, राकेश अप्पू काळे, विशाल राजेश काळे, दीपक चव्हाण, कोमल दीपक चव्हाण, दीपा हनुमंत काळे, जिजाबाई रामचंद्र चव्हाण, अपर्णा धनंजय चव्हाण, विद्या दीपक चव्हाण व 30 ते 40 अनोळखी पारधी तांडा येथील महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.