कुपवाड : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणातून पतीने पत्नीच्या गळ्यावर, हातावर कुर्हाडीने हल्ला केला. सुहासिनी यल्लाप्पा डबन्नावर (वय 29, सध्या रा. शिवशक्तीनगर, कुपवाड, मूळ गाव मायाक्का चिंचणी गणीकोडी, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे जखमी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित पती यल्लाप्पा सत्याप्पा डबन्नावर (वय 35, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) याच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुहासिनी या पती व दोन मुलांसह शिवशक्तीनगर, कुपवाड येथे राहतात. पती गवंडीकाम करतो, तर सुहासिनी या मिरज एमआयडीसीतील रुग्णालयात साफसफाईचे काम करतात. मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्या कामावरून घरी जात असताना मिरज एमआयडीसीतील बिरोबा मंदिरासमोरील रस्त्यावर पती थांबला होता. त्याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पत्नीने ‘माझ्याजवळ पैसे नाहीत’, असे म्हणताच त्याने हातातील कुर्हाडीने पत्नीच्या हातावर वार केला. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर त्याने गळ्यावर वार केला व तेथून तो पसार झाला. सुहासिनी यांच्या नातेवाईकांनी त्यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांनी पतीविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.