सांगली : विश्रामबाग चौकात सिग्नलजवळ फुगे विकून ते दोघे संसाराचा गाडा ओढत होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांचे एक वर्षाचे देखणे लेकरू पहाटे चोरट्याने पळवून नेले. विश्रामबाग चौकात ही घटना घडला. विश्रामबागसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तातडीने रवाना झाले. दिवसभर त्यांचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
राजस्थानच्या कोटा येथील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी सांगलीत आले आहे. त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. दररोज सकाळी ते सर्वचजण विश्रामबाग चौकात फुगे विकतात. त्यातून पैसे मिळवून ते आपला चरितार्थ चालवतात.
मंगळवारी नेहमीप्रमाणे ते रात्री त्याचठिकाणी झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास त्यांचे एक वर्षाचे बाळ चोरट्याने पळवून नेले. मातेला जाग आल्यानंतर लेकरू दिसत नसल्याने तिने टाहो फोडला. त्यानंतर ती माता विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेली. त्याठिकाणी निरीक्षक सुधीर भालेराव यांना माहिती दिली. अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने एलसीबीचे पथकही त्या बाळाच्या शोधासाठी रवाना केले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. पण, बाळ सापडले नव्हते.