सांगली : अचानक मुसळधार पाऊस, पावसाने तुंबलेल्या गटारीतील घाणेघाण पाणी रस्त्यावर आणि पावसानंतर पडणार्या कडक उन्हामुळे त्याच घाणीची होणारी धूळ थेट फुफ्फुसात... सारी सांगली व्हायरल आजारांनी त्रस्त झाली आहे.
बदलते हवामान आणि त्यात शहरभर होणार्या धुळीच्या प्रचंड त्रासाने शहरात व्हायरल आजारांची साथ न आल्यास नवलच आहे. अगोदरच पावसाच्या पाण्याचा निचरा करायला आणि गटारी साफ करायला साफ नापास झालेली महापालिका पावसानंतर धुळीवर मात करण्यातही अयशस्वी ठरली आहे. मात्र याचे गंभीर परिणाम सांगलीकरांना भोगावे लागत आहेत.
शहरातील एकही रस्ता धड राहिलेला नाही. प्रत्येक रस्त्यात जीवघेणे खड्डे पडले आहेत. माधवनगर ते कॉलेज कॉर्नर, अंकली फाटा ते मुख्य बसस्थानक, राम मंदिर चौक ते मिरज, कर्नाळ पोलिस चौकी ते शिवशंभो चौक, आमराई चौक ते जिल्हाधिकारी निवासस्थान, आपटा पोलिस चौकी ते कॉलेज कॉर्नर, स्फूर्ती चौक, राम मंदिर चौक ते काँग्रेस भवन... असे सांगलीतील सारेच रस्ते खड्ड्यात आणि धुळीत फसले आहेत. सार्या चौकात पावसाचे पाणी आणि रस्त्याकडेच्या गटारीतील प्रचंड घाण पाणी साचून राहते. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे याच घाणीची धूळ होते आणि ती थेट माणसांच्या फुफ्फुसात जाते. यातून आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे.
सतत उकरले जाणारे रस्ते, खड्डे, गॅस पाईपलाईन यामुळे सततच्या धुळीमुळे आपल्या प्रकृतीवर सतत परिणाम होतो. त्यामुळे अॅलर्जी, श्वसनवाहिनी अरुंद होणे, अस्थमा, सतत सर्दी, कफ साचणे हे आजार उद्भवतात. लहान मुलांमध्ये धुलिकण जाऊन सर्दी साचणे, फुप्फुसावर परिणाम, बालदमा, क्षय, जुनाट सर्दी होऊ शकते.डॉ. दीपाली जाधव, मिरज