अंजर अथणीकर
सांगली : ऑक्टोबर हा सुटीचा कालावधी नेमका गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीचा आल्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले नाही. यामुळे सांगली-मिरजेत सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. शहरातील 13 रक्तपेढ्यांपैकी बहुतेक पेढ्यांमधील रक्तसाठा हा 50 टक्क्यांच्या आसपास आला असून बहुतांशी रक्तपेढ्यांकडे आठ दिवस पुरेल इतकाच साठा आहे. त्यामुळे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे.
सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयाबरोबर मोठ्या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. गेल्या महिन्याभरापासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी रुग्ण व नातेवाइकांची धावपळ होत आहे. रुग्णालये नातेवाइकांना रक्तपिशवीच्या (एका पिशवीत असते 350 मिली रक्त) बदल्यात रक्तदान करायला सांगत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून हा तुटवडा भासत आहे. यामुळे अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, कर्करोग तसेच इतर शस्त्रक्रिया करणार्या रुग्णांना आवश्यक तेवढे रक्त मिळणे अवघड झाले आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आलेल्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमुळे सुटीबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले नाही. सणासुदीमुळे रक्तदातेही पुढे आले नाहीत. दुसर्या बाजूला महाविद्यालय, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या परीक्षा असल्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकले नाहीत. याचा परिणाम रक्त संकलन गेल्या दीड महिन्यात होऊ शकले नाही. मागणी मात्र पूर्ववत राहिल्याने तुटवाडा जाणवत आहे.
पूर्वी एका रक्त घटकासाठी संपूर्ण रक्त घेतले जायचे, पण आता अत्याधुनिक प्रणाली वापरून रुग्णाला आवश्यकतेनुसार, रक्तातील लाल रक्तपेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट्स इत्यादी घटक वेगळे करून ते किमान चार रुग्णांना दिले जाते. यासाठीही सध्या रक्ताची गरज वाढली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून कॉलेज सुरू होत असल्यामुळे रक्तदान शिबिरे होतात. यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
सांगली- मिरजेत एकूण रक्तपेढ्या : 13
दररोज सुमारे 5,200 पिशव्या रक्ताची गरज.
सध्या केवळ 2,600 ते 2,700 पिशव्या उपलब्ध.
वीस दिवसांपासून जाणवत आहे तुटवडा.
शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची आली वेळ.
शरीरात साधारण 5 ते 6 लिटर रक्त असते. त्यातील 360 मिली रक्त तीन महिन्यांतून एकदा देता येऊ शकते. एवढे रक्त शरीर पुढच्या दोन दिवसात तयार करू शकते. रक्तदानानंतर पुन्हा रक्त लगेच पूर्ववत होते. यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. याचे आत्मिक समाधान रक्तदात्यानी घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
तुम्ही रक्तदानाच्या दिवशी आजारी असल्यास.
तुम्ही कोणत्याही आजारावर नियमित उपचार घेत असल्यास.
सहा महिन्यांत तुमच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास.
सहा महिन्यांत तुम्ही तुमच्या शरीरावर काही टॅटू काढले असल्यास.
तुमचा भूतकाळात गर्भपात झाला असल्यास.
रक्तदात्याने भरपूर पाणी प्यावे. योग्य आहार घेतला पाहिजे. अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये. पुरेशी (कमीत कमी 8 तास) झोप घ्या. योग्य आणि सैल कपडे घालावे. औषधोपचार चालू असतील तर कळवावे.
किमान 15 मिनिटे विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस घ्यावा. 6 तासांनंतर हातावर लावलेली पट्टी काढून टाकावी. रक्तदान केल्यानंतर लगेच धूम्रपान करू नये किंवा वाहन चालवू नये.
जर तुमचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असेल. तुमचे वजन 45 कि.ग्रा. पेक्षा जास्त असेल. जर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. जर तुमचे उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) सामान्य असेल. तुमच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य असल्यास (12.5 ग्रॅम)
रक्तदानाने दुसर्याचे जीव वाचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. एक निरोगी व्यक्ती तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकते. एका रक्तदानाचा फायदा चार रुग्णांना होऊ शकतो. रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्त तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते. रक्ताची गरज भासल्यास फक्त मान्यताप्राप्त रक्तपेढीतूनच रक्त घ्या. प्रत्येकवेळी रक्त घेताना नवीन सुईचाच वापर होईल याची काळजी घ्या. रक्त घेताना एच. आय. व्ही. निगेटीव्ह आहे याची खात्री करूनच घेणे. रक्तदानाने अशक्तपणा, थकवा किंवा लैंगिक शक्तीचा र्हास होतो हा गैरसमज आहे.