सांगली : भाजपाची सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर झाली. सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, सदस्यपदी निवड झालेल्यांची यादी पाहता त्यावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे. प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या समर्थकांना सरचिटणीस, उपाध्यक्ष पदावर संधी मिळालेली नाही. या गटाची प्रामुख्याने सदस्य पदांवर बोळवण करण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांना डावलल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी भाजपमध्ये ‘भांडण-बिंडण’ काही नसल्याचे सांगत गटबाजीवर सारवासारव केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये पाच सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष, नऊ चिटणीस, प्रत्येकी एक कोषाध्यक्ष आणि प्रसिद्धीप्रमुख तसेच 73 सदस्यांचा समावेश आहे. सहा जिल्हा मोर्चा अध्यक्षांची नावेही यावेळी जाहीर करण्यात आली आहेत.
महापालिका क्षेत्रांतर्गत भाजपमध्ये आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे तसेच जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे प्रमुख नेते आहेत. कार्यकारिणीची यादी पाहता आमदार खाडे व आमदार गाडगीळ यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे. पृथ्वीराज पवार, दिनकर पाटील समर्थकांना सरचिटणीस, उपाध्यक्षपद मिळालेले आहे. या दोन्ही नेत्यांचे आ. गाडगीळ यांच्याशी सख्य आहे.
पाच सरचिटणीस व आठ उपाध्यक्षांमध्ये शेखर इनामदार समर्थकांना संधी मिळालेली नाही. नऊ चिटणीसांच्या यादीत इनामदार समर्थक श्रीकांत वाघमोडे नवव्या क्रमांकावर आहेत. कोषाध्यक्षपदी धनेश कातगडे यांची फेरनिवड झाली आहे. ते इनामदार समर्थक आहेत. शहर जिल्हा कार्यकारिणीत 73 सदस्य आहेत. त्यामध्ये इनामदारसमर्थक पृथ्वीराज पाटील, अमित गडदे यांच्यासह एकूण 8 सदस्यांचा समावेश आहे. युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अध्यक्ष निवडीतही आमदार सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांचा वरचष्मा दिसत आहे. शहर जिल्हा कार्यकारिणीत जयश्री पाटील समर्थकांचा समावेश नाही. पृथ्वीराज पाटील समर्थकांचीही वर्णी नाही. त्यामुळे जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांना डावलल्याची, तर शेखर इनामदार यांची बोळवण केल्याची चर्चा होत आहे.