पलूस : मोराळे (ता. पलूस) येथे अटक टाळण्यासाठी पोलिस पथकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हैबती गुंडा पाटील आणि त्याची आई रुक्मिणी गुंडा पाटील या दोघांविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजी विठ्ठल जाधव (वय 45, रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, सध्या रा. पलूस) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हैबती पाटील यास अटक केली आहे. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबररोजी हैबत पाटील याने त्याचा चुलत भाऊ धनाजी पाटील याला पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ करून डोक्यात कुर्हाडीने वार केला होता. गुरुवार, दि. 9 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस पथक हैबती यास अटक करण्यासाठी मोराळे येथे गेले होते. त्यावेळी हैबती व त्याच्या आईने पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान, हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांनी त्यास घराबाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्यांना ढकलून दिले. काठीने हात व पायावर मारहाण केली. चेहर्यावर थुंकत त्यांचे कपडे फाडले. या प्रकारामुळे हैबती याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि लोकसेवकावर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हैबती पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 11 गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याने त्याला यापूर्वी हद्दपारही करण्यात आले होते. तरीसुद्धा तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रीय झाला असून परिसरात दहशत निर्माण केली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.