तासगाव : सप्टेंबर अखेरीस सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे अद्याप शासनाकडून न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित आर. आर. पाटील आक्रमक झाले आहेत. "दोन दिवसांत पंचनामे सुरू झाले नाहीत, तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि सळो की पळो करून सोडू." असा इशारा त्यांनी गुरूवारी (दि.९) सरकारला दिला.
रोहित पाटील यांनी समाज माध्यमावर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जिल्ह्यातील हजारो एकरावरील द्राक्ष उत्पादक शेतकरी आज संकटात आहेत. पावसामुळे फळ झाड, मुळे कुजणे, आणि रोगराई यामुळे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून हातात काही उरलेले नाही. प्रशासनावर टीका करत आमदार पाटील म्हणाले, पावसाने नुकसान होऊन दोन आठवडे होत आले, पण अद्याप एकाही शेतकऱ्याच्या शेतात अधिकारी पंचनामा करायला गेलेले नाहीत. हे प्रशासनाचे पूर्णतः अपयश असून सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे.
शासन, प्रशासन आणि नॅशनल रिसर्च फॉर ग्रेपस यांच्याकडे द्राक्षांचे पंचनामे केले जावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. जर पुढील ४८ तासांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत जाहीर केली नाही, तर आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असे ते म्हणाले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांसारख्या तत्काळ मदतीच्या उपाययोजना राबवाव्यात. शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी यंत्रणा तातडीने कामाला लागावी, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.