दापोली : दापोलीतील हर्णे बंदरात जवळपास 750 हून अधिक लहान-मोठ्या मासेमारी बोटी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी पाचशेहून अधिक नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. मात्र, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वादळाच्या शक्यतेमुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प होती.
रविवारी हवामानात स्थिरता दिसताच मच्छीमार बांधवांनी पुन्हा समुद्राचा अंदाज घेत जाळी टाकण्यास सुरुवात केली. सकाळपासून बंदर परिसरात बोटी सजवण्याची लगबग, इंजिनांचा आवाज आणि उत्साहाचा माहोल दिसून आला. काही बोटी सकाळीच निघाल्या तर काही दुपारनंतर; उर्वरित रात्रीच्या भरतीत समुद्रात उतरणार आहेत. मच्छीमारांनी जाळी, बर्फ, इंधन आणि सुरक्षेची साधने सज्ज ठेवली आहेत. गेल्या आठवड्यातील ठप्प पडलेल्या व्यवसायामुळे आर्थिक ताण जाणवत होता. त्यामुळे हवामान अनुकूल होताच त्यांनी पुन्हा समुद्रावर विश्वास ठेवून प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, हवामान विभागाने अजूनही हलका ते मध्यम वारा आणि उंच लाटांचा इशारा कायम ठेवला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना सावधगिरीने मासेमारी करण्याचे आवाहन केले आहे. हर्णे बंदरात पुन्हा इंजिनांचा गडगडाट, जाळ्यांची लगबग आणि मच्छिमारांचा उत्साह परतला आहे. वादळाचे सावट असले तरी समुद्राशी नाळ जुळलेल्या मच्छिमारांचा आत्मविश्वास अजूनही तगडा आहे.