सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे महापालिकेत कामांच्या मंजुरींचा धडाका सुरू आहे. स्थायी समिती, महासभेत विविध 8 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती व नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने मिरज व कुपवाड येथे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे, चौक सुशोभीकरण कामांचा समावेश आहे.
महापालिकेत प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
कुपवाड खुले नाट्यगृह येथे व मिरजेतील नवीन अग्निशमन केंद्र येथे नावीन्यपूर्ण योजनेतून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रत्येकी 74 लाख 99 हजार 133 रुपयांच्या कामांची निविदा मागण्यास व या रकमेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सांगलीतील विश्रामबाग गणपती मंदिर विकसित करण्याकरिता 54 लाख 85 हजार 952 रुपयांच्या कामांसाठी निविदा मागण्यास व या रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या वाहनांना सुटे भाग पुरविणे व वाहन दुरुस्तीच्या मजुरीसाठी 99 लाख रुपयांंच्या कामाची निविदा मागवण्यात आली होती. 4.1 टक्के कमी दराच्या निविदेस सभेत मंजुरी देण्यात आली.
सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल चौक सुशोभीकरणासाठी 94 लाख 76 हजार 378 रुपये, कॉलेज कॉर्नर चौक विकसित करण्यासाठी 1 कोटी 31 लाख 70 हजार 633 रुपयांच्या कामांची निविदा काढण्यासाठी व या रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील महावितरणशी संबंधीत कामे करण्यासाठी 40 लाख 51 हजार 980 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेतून नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्राप्त यादीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील 6 कामांचा 2 कोटी 48 लाख 37 हजार 781 रुपयांचा तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यादीनुसार जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत 7 कामांच्या 2 कोटी 33 लाख रुपयांच्या प्रस्तावास सभेत मान्यता देण्यात आली. हे दोन्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत स्ट्राँग रुम, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये, मत मोजणी ठिकाण ई.व्ही.एम. गोडावून, मतदान यंत्रे एफ.एल.सी. कार्यालय व मतदान केंद्रे या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसविणे अनुषंगिक कामांसाठी 96 लाख 92 हजार 736 रुपयांची तसेच या ठिकाणी विद्युत व्यवस्था व कामांसाठी 85 लाख 36 हजार 663 रुपये अशा 1 कोटी 82 लाख 29 हजार 399 रुपयांच्या कामाची निविदा काढण्यास व खर्चास सभेत मान्यता देण्यात आली.