महावितरणकडून वीज स्वस्तचा भूलभुलैया  
सांगली

Sangli : महावितरणकडून वीज स्वस्तचा भूलभुलैया

मार्चमध्ये दरात वाढ करून जुलैमध्ये दर कमी करण्याची घोषणा

पुढारी वृत्तसेवा
शशिकांत शिंदे

सांगली : महावितरण कंपनीने वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार अशी घोषणा केली आहे. पुढील पाच वर्षात टप्प्या-टप्प्याने ते 26 टक्केपर्यंत विजेचे दर कमी होणार असे सांगण्यात येत आहे. मात्र देशातील अनेक राज्यांत मोफत व कमी दरात वीज उपलब्ध असताना महावितरणने मात्र मार्चमध्ये दरात वाढ करून जुलैपासून कमी दरात वीज देण्याचे सांगण्यात येत आहे. मुळात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांना हा लाभ होणार आहे. ही संख्या कमी असल्याने प्रत्यक्षात याचा लाभ फार कमी ग्राहकांना मिळणार आहे. त्यावरून वीज दर कमी करण्यावरून महावितरणचा भूलभुलैया लक्षात येत आहे.

दिल्ली, कर्नाटकसह देशातील अनेक राज्यात मोफत व सवलतीच्या दरात वीज देण्यात येत होती. त्यामुळे महाराष्ट्रातही देण्यात यावी अशी मागणी होत होती. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र मार्चमध्ये विजेचे दर वाढवण्यात आले. 100 युनिटपर्यंत तब्बल 24 % वीज दरवाढ करण्यात आली होती. त्याशिवाय 101 ते 300 युनिटपर्यंत 11.45%, तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत 11.56% वीज दरवाढ करण्यात आली. विजेची दरवाढ झाल्याने नागरिकांच्यातून असंतोष पसरला होता. विरोधकांच्याकडून सरकारवर टीका केली जात होती. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यामध्ये वीज दर वाढीसंदर्भातील मुद्दा विरोधकांच्याकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने वीज दरात दहा टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मुळात मार्चमध्ये 100 युनिटपर्यंत 24% वीज दरवाढ केली होती. त्यामुळे ही वीज सवलत म्हणजे सरकारकडून धूळफेक असल्याची टीका नागरिकांच्यातून होत आहे. पुढील पाच वर्षात टप्प्या-टप्प्याने आणखी वीज स्वस्त देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकारकडून ही धूळफेक असल्याची टीका होत आहे.

एक युनिट म्हणजे किती वीज...

विजेचे एक युनिट म्हणजे 1 किलोवॅट-तास. याचा अर्थ असा की, 1 किलोवॅट (1000 वॅट) ची एक वस्तू 1 तास वापरल्यास ती 1 युनिट वीज वापरते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2000 वॅटचा हीटर अर्धा तास वापरला, तर त्याने 1 युनिट वीज वापरली जाईल. टीव्ही जो सुमारे शंभर वॅट वापरतो, तो जर दहा तास चालवला तर एक युनिट वीज खर्च होते. वीज बिलामध्ये युनिट्सच्या आधारावर वीज वापर मोजला जातो. त्यामुळे, किती वीज वापरली, हे युनिट्समध्ये सांगितले जाते. सध्या घरगुती विजेचे एक युनिटचे सर्वसाधारण बील हे सात रुपये आकारले जाते.

दिल्लीत तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीज कंपन्यांचे ऑडिट करून ग्राहकांना स्वस्तात वीज उपलब्ध करून दिली. त्या पद्धतीने येथे सुद्धा लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे वीज आणखी सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते.
रमेश सहस्त्रबुद्धे वीज कामगार संघटनेचे नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT