सिग्नल नसणारे पलूस राज्यात एकमेव शहर? 
सांगली

Sangli News : सिग्नल नसणारे पलूस राज्यात एकमेव शहर?

वाहतूक वाढली, पण नियोजन कुठे आहे? ः अपघातांचा धोका

पुढारी वृत्तसेवा

तुकाराम धायगुडे

पलूस ः वेगाने विकसित होत असलेले पलूस शहर हे सध्या एका गंभीर प्रश्नाच्या छायेखाली आहे. शहरात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही! सुमारे 25 वर्षांपूर्वी तालुक्याचा दर्जा प्राप्त झालेल्या आणि 7 वर्षांपूर्वी नगरपरिषद अस्तित्वात आलेल्या या शहराची ही स्थिती म्हणजे, प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शहरात वाहनांची संख्या दरवर्षी प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत वाहतूक नियोजन आणि नियंत्रणाचा अभाव दिसत आहे. जुना बसस्थानक चौक आणि नवीन बसस्थानक चौक या प्रमुख चौकात रहदारीचा गोंधळ उडतो आहे.जुना बसस्थानक चौक हा संपूर्ण पलूस शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक मानला जातो. या ठिकाणावरून आमणापूर, आंधळी, कराड, तासगाव, सांगलीला जाणारी वाहने नियमितपणे ये-जा करतात. तसेच विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर हा चौक येत असल्यामुळे इतरत्र जाणारी वाहतूक सुरू असते.

पण या चौकात सिग्नल नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, भाविक अशा सर्वांनाच वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा त्रास सहन करावा लागतो. या चौकात श्री धोंडिराज महाराज मंदिर असल्यामुळे येथे नियमितपणे मोठ्या संख्येने भक्तगण येतात. तसेच या ठिकाणी काही शैक्षणिक संस्थाही आहेत. मात्र सिग्नल नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. यापूर्वी याठिकाणी काही लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. तसेच या चौकात नियोजित पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच वाहनांचे बेशिस्त पार्किंग केले जाते. त्यात भर म्हणून फुले, फळे विक्रेते रस्त्यालगत व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी

या गंभीर समस्येकडे पलूस पोलिस, नगरपरिषद आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहराच्या सुसूत्र वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल लावणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी तत्काळ निधीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT