सांगली : महानगरपालिकेच्यावतीने रविवारी तिसर्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार राबवण्यात आली. येथील कोल्हापूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या एका प्रार्थनास्थळासह 50 हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. बहुतांशी खोकी मालकांनी आपली खोकी काढून घेतली. बसस्थानक परिसरातील चार खोकी न्यायप्रविष्ट असल्यामुळे, तर काही खोकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आल्याने उद्या सोमवारी यासंदर्भात चर्चा करून ही खोकी काढण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.
महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी 35 मीटर रुंदीने रस्त्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे. या हद्दीतील सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेने शुक्रवारपासून सुरू केली. रविवारी सकाळपासूनच पुन्हा अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमणाविरोधी विभागाचे मुख व सहायक आयुक्त नागार्जुन द्रासी, सहायक आयुक्त सचिन गावकर, स्वच्छता निरीक्षक आदींच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महावितरण, वाहतूक पोलिस आणि बांधकाम विभागाचे पथकही सहभागी झाले होते. सांगली - कोल्हापूर रस्त्यावरील हटवण्यात आलेली खोकी घेऊन जाताना रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
जेसीबीच्या साहाय्याने खोकी उचलण्यात आली. त्यानंतर खोक्याचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर रस्ता रुंदीकरणामध्ये येणारे प्रार्थना स्थळ महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवले. त्याचे बांधकाम हटवण्यात आले. काही खोक्यांवर महापालिकेने जेसीबी चालवला. त्यावेळी वादावादीचे प्रकार घडले. काही खोकीधारकांनी आपले खोकी स्वत:हून काढून घेतली. आज दिवसभरात सुमारे 50हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. उद्याही ही मोहीम सुरूच राहणार आहे.
कोल्हापूर रस्त्याचे पूर्ण रुंदीकरण करुनच ही मोहिम थांबवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील जागेसंदर्भात सोमवारी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर न्यायप्रविष्ट जागेबाबतही पुन्हा माहिती घेण्यात येईल. अवैध धंदे सुरु असलेल्या खोक्याचा परवाना रद्द करण्यात येईल.स्मृती पाटील, उपायुक्त