सांगली ः शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचा शोध घेण्यासाठी दि. 1 ते 15 जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले, या सर्वेक्षणासाठी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक हे शहरी भागात प्रगणक म्हणून काम करतील, तसेच ग्रामीण भागातील 6 ते 18 वयोगटासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्यावर शहरी व ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटासाठी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी असेल. शाळाबाह्य बालकांच्या नोंदीसाठी घरोघरी, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, झोपडपट्टी, गाव, वाड्या-वस्त्या, गावाबाहेरची पाले, शेतमळा, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या, दगडखाणी, फुटपाथ, बालमजूर, भटक्या जमाती, मोठी बांधकामे, अशा ठिकाणी जगजागृती केली जाणार आहे. सर्व स्थळांवर भेट देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. इतर विभागांचेही यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे.
गायकवाड म्हणाले, गावात कोणी नवीन कुटुंब आले असल्यास त्या कुटुंबात असलेल्या मुलांनी शाळेत प्रवेश घेतला का, याचीही माहिती घेतली जाणार आहे. तसेच दाखला घेऊन काही विद्यार्थी परजिल्ह्यात गेले आहेत, त्यांनी तेथील शाळेत प्रवेश घेतला का, याचीही माहिती घेतली जाणार आहे. काही विद्यार्थी पालकांसोबत कामाच्या ठिकाणी जातात. काहीजण काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. परिणामी शिक्षण सुटते, अशा विद्यार्थ्यांचाही शोध घेतला जाणार आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणत्याही कारणास्तव 6 ते 14 वर्षे वयोगटातील एकही बालक शाळाबाह्य राहू नयेे, याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद