मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी (ता. मिरज) येथे टँकरला पाठीमागून मोटारीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
धाराशिवमधील एक व्यक्ती मोटारीतून (क्र. एमएच 25 एडब्ल्यू 9906) रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून धाराशिवकडे निघाली होती. याचदरम्यान कळंबी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी टँकर उभा होता. या टँकरचा मोटार चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगात असणारी मोटार टँकरवर जाऊन आदळली. त्यानंतर दोन ते तीन कोलांट्या घेत मोटार महामार्गाच्या कडेला जाऊन उलटली. अपघातात मोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत चालकाचे नाव समजू शकले नाही. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलिस करीत आहेत.