मिरज : सांगली शहर आणि परिसरातील रसिक नाट्यप्रेमींसाठी ‘पुढारी नाट्योत्सवा’त सोमवारी झालेल्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि नाटककार, अभिनेते संकर्षण कर्हाडेलिखित या नाटकास रसिकांनी हशा आणि टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
माहिती आणि तंत्रज्ञानाने बदललेल्या सध्याच्या गतिमान काळातील मानवी नातेसंबंधावर नाटककाराने भाष्य केले आहे. ते करताना रसिकांना हसवता-हसवता नाटककार अंतर्मुखही करतो. नातेसंबंध, पिढ्यांमधील अंतर आणि बदललेली जीवनशैली, असा प्रवास रसिकांना घडवला जातो. तो प्रवास करताना रसिकांना आनंदाची मेजवानी मिळते.
स्वतः नाटककार संकर्षण कर्हाडे यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारलेली आहे. पत्नीच्या भूमिकेत अमृता देशमुख यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे. समुपदेशकाच्या भूमिकेतील मंगेश भिडे यांनीही त्यांचे काम उत्तमप्रकारे केले. तिघांचीही केमिस्ट्री इतकी छान जमलेली होती, की नाटक कधी सुरू होते आणि संपते कळतही नाही. बदलता काळ आणि लग्न संस्था या पैलूंवर केलेले सादरीकरण, ‘गौरी थिएटर्स’निर्मित आणि ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ प्रकाशित होते. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ हे ‘दैनिक पुढारी’च्या या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत.
यावेळी ‘दैनिक पुढारी’च्यावतीने गाडगीळ कुटुंबीयांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. गाडगीळ कुटुंबीयांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.