जत : सामाजिक उपक्रम आणि शेतकरीहित आमदार गोपीचंद पडळकर साकारत असतात, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त खर्च टाळून कार्यकर्त्यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीकाठच्या पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 50 ट्रक ओला व सुका चारा पाठवण्यात आला. हा चारा ग्रामविकासमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते रवाना करण्यात आला. हा उपक्रम सोलापूरचे आमदार पडळकर समर्थक माऊली हळणवर, कवठेमहांकाळचे संदीप गिड्डे - पाटील, मल्हार कोळेकर यांच्यावतीने राबवण्यात आला.
पुरामुळे सिना नदीकाठच्या गावांतील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांसाठी चार्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. आमदार पडळकर यांनी नुकतीच कुंभेज व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांची व्यथा जाणून घेतली. या पाहणीनंतर आमदार पडळकर म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच शेतकर्यांना मदत करतील. सामाजिक बांधिलकी व दायित्व म्हणून सर्वांनी अशाप्रसंगी प्रत्येक शेतकर्याच्या घरी मदत पोहोचविणे हीच खरी सहानुभूती आहे.
या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष कृती केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांसाठी 50 ट्रक व पिकअप वाहनांतून चार्याची वाहतूक करण्यात आली. भोयरे, आष्टे, पोफळे, साबळेवाडी, कोळेगाव (येळेवस्ती, काळेवस्ती), वडवळ, रामहिंगणी, नांदगाव, उंदरगाव, केवड, कुंभेंज, खैराव, नायकुडे वस्ती यांसह अनेक गावांपर्यंत हा चारा पोहोचविण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन संदीप आबा गिड्डे पाटील, माऊली हळणवर व मल्हार कोळेकर यांनी केले.
पंढरपूर येथून रवाना झालेली 50 वाहने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. गत आठवड्यात आमदार पडळकर यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी 50 टन धान्य पाठवण्यात आले होते.
पूरग्रस्त शेतकर्यांचा प्रश्न केवळ शासनाचा नाही, तो आपला सगळ्यांचा आहे. मुक्या जनावरांसाठी चारा पोहोचविणे ही खरी मानवतेची सेवा आहे. सामाजिक बांधिलकी व दायित्व म्हणून सामाजिक संघटना व सर्वांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची नितांत गरज आहे.- गोपीचंद पडळकर, आमदार