मिरज : मिरज एमआयडीसी क्षेत्रामधील मूलभूत सुविधांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून महानगरपालिका, लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर नसून येत्या मनपा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार आहे. सुविधा मिळाव्यात याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
यावेळी उपाध्यक्ष हर्षल खरे, सहसचिव अतुल पाटील, संचालक संजय खांबे, व्यवस्थापक गणेश निकम उपस्थित होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने बैठक घेऊन सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु दिलेली आश्वासने फसवी ठरली असून त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. वेळोवेळी झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभांमध्येदेखील वारंवार मागणी केली आहे. तसेच दि. 10 जुलैरोजी महापालिकेशी संबंधित विषयांवर आयुक्तयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष जिल्हा उद्योग मित्र समिती सभेमध्ये मिरज एमआयडीसीमधील रस्ते तसेच स्ट्रीटलाईट दुरुस्तीचा विषय घेण्यात आला होता. यावेळी स्ट्रीटलाईट महापालिकेच्या स्वखर्चाने दोन दिवसात सुरू करून देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले होते. परंतु आज चार महिने उलटूनही एकही स्ट्रीटलाईट चालू झाले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये महानगरपलिका मालमत्ता कर 2 कोटी, एमआयडीसीचा सर्विस चार्ज 1 कोटी, 200 कोटींचा जीएसटी कर भरूनदेखील सुविधा दिल्या जात नसून या भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, अशी धारणा उद्योजकांची झाली आहे. याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा येणारा काळात होणार्या सर्व बैठका, सरकारी कार्यक्रम यावर बहिष्कार टाकून निवडणुकांवर त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय या भागातील उद्योजक शांत बसणार नाहीत.