मिरज : मिरजेत बनावट नोटरी शिक्के तयार करून परस्पर कागदपत्रे तयार करून नोटरी वकिलाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अॅड. मारुती भैराप्पा पाटील यांनी इरफान शहाबुद्दीन हंगड (रा. नदीवेस, मिरज) याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
फसवणूक झालेले नोटरी वकील मारुती पाटील व संशयित इरफान हंगड हे पूर्वी एकाच कार्यालयात काम करीत होते. यादरम्यान इरफान याने पाटील यांच्या परस्पर त्यांचे बनावट शिक्के बनवले. त्यानंतर मारुती पाटील यांनी नव्या कार्यालयात स्थलांतर केले.
दरम्यानच्या काळात इरफान हंगड हा मारुती पाटील यांच्या बनावट नोटरी शिक्क्यांच्या वापर करून नोटरी करून देत होता. दि. 17 रोजी एका व्यक्तीच्या हातामध्ये त्यांच्याच शिक्क्यांची नोटरी मारुती पाटील यांना दिसून आली. त्यांनी चौकशी केली असता, त्याने इरफान याने नोटरी करून दिल्याचे सांगितले. त्यानंतर मारुती पाटील यांनी ज्यांच्या नावे नोटरी केली होती ते सुनील जिनाप्पा नांद्रे व त्यांची पत्नी विद्या सुनील नांद्रे या वकील दाम्पत्याकडे चौकशी केली. त्यावेळी इरफान यानेच नोटरी करून दिल्याचे समोर आले.
त्यावेळी बनावट शिक्क्यांच्या आधारे परस्पर त्यांच्या नावावर नोटरी केली जात असल्याचे मारुती पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी बनावट शिक्क्यांच्या आधारे अनेक कागदपत्रांची इरफान याने नोटरी केली असल्याचे मारुती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इरफान याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.