जत : जतपूर्व भागातील एका गावात अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संशयिताने तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी संशयित प्रताप महिंद्रा सावंत (रा. सालेकीरी, ता. जत) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 पोक्सोचे कलम 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने जत पोलिसात फिर्याद दिली.
जतपूर्व भागातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी शाळेला जात होती. रस्त्यावर एका ठिकाणी तिच्या पाठीमागून संशयित प्रताप हा मोटरसायकलवरून आला. त्याने मुलीचा हात धरून “तू मला खूप आवडतेस” असे म्हणून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी जत पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, संशयित प्रताप हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.