माडग्याळ : माडग्याळ येथे शनिवारी मध्यरात्री भीषण अग्नितांडव घडले. यामध्ये दोन दुकाने जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. उमदी पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली.
माडग्याळ येथे सचिन रोडे यांचे बाळूमामा इलेक्ट्रिकल्स तसेच महादेव शिवबसू माळी यांचे सिद्धनाथ ऑटो गॅरेज या दोन दुकानांना शनिवारी दि. 25 रोजी रात्री 11 वाजता भीषण आग लागली. ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने दुकानाचे शटर उचकटून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही.
रोडे यांच्या दुकानातील 10 ते 12 लाखांच्या इलेक्ट्रिकल वायर, फिटिंग साहित्य, इतर वस्तू जळून खाक झाल्या. जवळच असलेले सिद्धनाथ ऑटो गॅरेजही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत मोटरसायकल व दुचाकी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. ऑटो गॅरेजचे अंदाजे 4 लाखांचे नुकसान झाले. ऐन दिवाळीत या दुकानदारांवर संकट कोसळले आहे.