दिघंची ः दिघंची म्हसवड रस्त्यावरील लिंगीवरे गावापासून जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या कामासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध झाला होता, मात्र वर्षभरात केवळ खडीकरणाचे अर्धवट काम झाल्याने वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सांगली व सातारा जिल्ह्याला जोडणारा व लिंगिवरे गावावरून म्हसवडला जाणारा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. याशिवाय हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरून ऊस, दूध वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. तरीही गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम रखडले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दोन किलोमीटर अंतराच्या या रस्त्याची अंदाज पत्रकीय रक्कम 1 कोटी रुपये आहे. या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. सुरवातीला केवळ खडीकरण करून काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित ठेकदार या कामाकडे फिरकलेला नाही, अवघ्या दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी तब्बल 1 कोटीचा निधी उपलब्ध होऊनही या रस्त्यावर केवळ खडीकरणच केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खडी उखडून वर आली आहे. यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचेदेखील याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे या मार्गावरून जाणार्या प्रवाशांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांतून होत आहे.
लिंगीवरे गावापासून म्हसवडला जाणारा हा दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे. निधी मंजूर असून कामाला सुरुवात होऊन वर्ष उलटले आहे. ठेकेदार काम का पूर्ण करत नाही? याबाबत चौकशी करणार आहे.जनार्दन झिंबल माजी जिल्हा परिषद सदस्य, लिंगीवरे