मांगले : मांगले - कांदे मार्गावर भैरवखडीदरम्यान रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक मादी बिबट्या व तिची चार पिले दृष्टीस पडली. यावेळी माणसांचा सुगावा लागताच बिबट्याने भैरवखडी डोंगराच्या दिशेने पलायन केले. बिबट्याच्या या मनुष्यवस्तीतील वावरामुळे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मांगले, कांदे परिसरामध्ये गेल्या पाच वर्षापासून बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मांगले कांदे शिंगटेवाडी भाटशिरगाव यादरम्यानच्या डोंगर परिसरामध्ये बिबट्याचे मोठे आश्रयस्थान आहे. त्यामुळे या परिसरातील शेळ्या-मेंढ्या गाई म्हशी वासरांवर तसेच कुत्र्यांवर बिबट्याने मोठ्या प्रमाणात हल्ले करून ठार मारले आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अमोल पाटील यांच्या घरासमोरून एक मादी बिबट्या व तिच्यासोबत चार लहान पिली वारणा नदीकडून मांगले-कांदे मार्गावरून भैरवखडीच्या डोंगराच्या दिशेस निघून गेली. मांगले-कांदे मार्गावरून जाणार्या लोकांच्या दृष्टीस हे बिबटे पडले. दरम्यान माणसांचा सुगावा लागताच बिबट्याने भैरवखडी डोंगराच्या दिशेने पलायन केले. या परिसरात मांगले व कांदे येथील लोकांची मोठ्या प्रमाणात घरे व जनावरांच्या वस्त्या आहेत. या परिसरातच बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.