मजुराचा मुलगा बनला पोलिस उपअधीक्षक  
सांगली

Sangli News : मजुराचा मुलगा बनला पोलिस उपअधीक्षक

म्हैसाळच्या माणतेश पाटीलचे यश; ग्रामस्थांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

पोपट घोरपडे

म्हैसाळ ः म्हैसाळ गावातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण मानतेश पाटील याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलिस उपअधीक्षक या पदाला गवसणी घातली आहे.अत्यंत खडतर परिस्थितीत त्याने दोन परीक्षा दिलेल्या होत्या. या दोन्ही परीक्षेत तो पात्र ठरला. दुसर्‍या प्रयत्नात यशस्वी ठरल्यानंतर पोलिस उपअधीक्षक पदाचा त्याने स्वीकार केला.

माणतेशचे वडील पिरगौंडा पाटील हे सामान्य मजूर आहेत. एका मजुराचा मुलगा पोलिस उपअधीक्षक झाल्याचा आनंद समस्त म्हैसाळकर ग्रामस्थांना होत आहे. माणतेश पाटील याची जिद्द, चिकाटी व सतत चार ते पाच वर्षे अभ्यासातील सातत्य यामुळे त्याने आपले स्वप्न सत्यात आणले. घरची परिस्थिती मध्यम कुटुंबातील असून सुद्धा अनेक अडचणीवर मात करत हा यशाचा टप्पा त्याने गाठला आहे. माणतेश याची पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाल्याची बातमी गावात येताच येथील त्याच्या मित्रमंडळींनी व गावातील ग्रामस्थांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.

आपण अधिकारी व्हायचे असे स्वप्न त्याने शालेय जीवनापासूनच उराशी बाळगले होते. एक दिवस वडील कामावर असताना त्यांना होणारा त्रास माणतेशने बघितला. त्यानंतर अभ्यास एके अभ्यास एवढेच त्याच्या डोक्यात कायम असायचे. त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण संपल्यावर तो पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेला. तेथे मुलांचे क्लासेस घेऊन आपला उरलेला वेळ अभ्यासाला देत ही यशाची लढाई पूर्ण केली. या यशात त्याचे आई, वडील व त्याच्या मित्रांची साथ त्याला मिळाली. माणतेश आता गावातील अन्य तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. त्याच्या यशाचा विशेष आनंद म्हैसाळकर ग्रामस्थांना नक्कीच आहे. या त्याच्या यशात त्याचे कुटुंब, मित्रमंडळी व त्याचे शिक्षक यांचे सहकार्य मिळाले. परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर प्रथमच तो म्हैसाळला घरी येताना त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

आमच्या कष्टाचे चीज केले...

माणतेशची आई अंगणवाडी सेविका आहे, तर वडील एका खासगी कंपनीत कामाला जातात. घरची परिस्थिती बेताची असतानाही माणतेशने जिद्दीने शिक्षण घेतले व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. अंगणवाडी शिक्षिका असलेली त्याची आई म्हणाली, माणतेशने आमच्या कष्टाचे चीज केले. आम्हाला विश्वास होता की, आमचा मुलगा एक दिवस नक्कीच मोठा अधिकारी होणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT