कुपवाड : येथील संजय औद्योगिक वसाहतीमधील इंडोटेक्स एक्स्पोर्ट या कंपनीच्या संचालिका ममता राजेंद्रकुमार बाफना यांची 19 लाख 64 हजार 401 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे-उल्हासनगर येथील संशयित व्यावसायिकाविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर नारायणदास केसवाणी (वय 35, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय औद्योगिक वसाहतीत ममता बाफना यांच्या मालकीची ‘इंडोटेक्स एक्स्पोर्ट’ या नावाने जीन्स कापडाची कंपनी आहे. ठाणे-उल्हासनगर येथील चिराग प्रेल्स (शॉप नंबर 3, बॅरेक नंबर 1847, रूम नंबर 10, सेक्शन 39) या फर्मचा संचालक सागर केसवाणी याने बाफना यांचा विश्वास संपादन करून दि. 27 जानेवारी 2023 ते दि. 19 एप्रिल 2023 या कालावधीत बाफना यांच्या फर्मला तयार जीन्स कापडाची ऑर्डर देऊन हा माल इंडोटेक्स कंपनीतून उल्हासनगर येथे नेला.
संशयित सागर केसवाणी याने खरेदी केलेल्या कापडाच्या बिलाची एकूण रक्कम 27 लाख 29 हजार 862 रुपये झाली होती. या बिलाच्या रकमेपैकी केसवाणी याने बाफना यांना 7 लाख 65 हजार 461 रुपये दिले होते. उर्वरित 19 लाख 64 हजार 401 रुपये नंतर देतो, असे सांगून तो कापड घेऊन गेला. त्यानंतर बाफना यांनी संशयित सागर केसवाणी याच्याकडे येणेबाकी असलेल्या रकमेची वेळोवेळी मागणी करूनही त्याने ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ममता बाफना यांनी संशयित सागर केसवाणी याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सागर केसवाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.