पलूस ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आमदार अरुण लाड आणि ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड यांना मनस्ताप होऊ नये, म्हणून मी क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा दिगंबर पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेसकडून पलूस शहराच्या विकासाच्या केलेल्या घोषणा फोल ठरल्याचा उल्लेख करून सर्वपक्षीय मोठी आघाडी उभारण्याचे प्रयत्न झाले. मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी काँग्रेसविरोधात पलूस शहरात प्रचंड रोष आहे. त्यांची सत्ता उलथवायची असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन लढणे अत्यावश्यक आहे. भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी पलूसकरांना तो मान्य नाही. आम्ही सर्व मित्रपक्षांसोबत एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
दिगंबर पाटील यांच्या या निर्णयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.