आष्टा : पाली-मराठी भाषेच्या संमेलनातून होणारा प्रसार आणि प्रचार भाषा विकासासाठी मत्त्त्वाचा असून मराठीइतकेच महत्त्व पालीलाही मिळायला हवे, त्याचीही संमेलने व्हावीत, अशी अपेक्षा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी पहिल्या पाली-मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात व्यक्त केली. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रा. शामराव पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, बुद्धकालीन पाली भाषेचा होणारा कमी वापर चिंतेचा विषय आहे. ज्या भाषेवर एक धर्म उभा राहिला, अन्य देशांमध्येही भाषेचा प्रसार झाला, भारतीय वंशाच्या या भाषेचा आणि धर्माचा, भाषेचा इतर देशातील प्रसार, विस्तार विचार करण्यासारखा आहे. या भाषेचे संमेलन घेण्यासाठी पुढाकार घेणार्या महेंद्र भारती आणि चिमण डांगे यांचे कौतुक करायला हवे. यापुढेही अशी संमेलने व्हावीत.
श्रीपाल सबनीस म्हणाले, सांस्कृतिक संवादासाठी हे संमेलन महत्त्वाचे आहे. बुद्ध जगभर पोहोचला आहे. माणसाला बुद्धाच्या विचारात महत्त्व आहे. आज जगात शांतीसाठी बुद्ध-महावीर-गांधी यांचाच विचार करावा लागणार आहे. शामराव पाटील म्हणाले, बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्यभर साहित्यविषयक उपक्रमांचा जागर सुरू आहे. पाली-मराठी भाषा विकासासाठी हे उपयुक्त ठरते आहे. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, पांडुरंग भोसले उपस्थित होते.