इस्लामपूर : येथील ‘माणुसकीचं नातं’ प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ‘दिवाळी गरजूंसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. व्हॉट्स अॅप ग्रुपवर केलेल्या आवाहनातून अवघ्या दोन-तीन दिवसात कोणालाही फोन न करता जमा झालेल्या सुमारे दीड लाखाच्या निधीतून निराधार, दिव्यांग आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचे घसघशीत किट घरपोहोच करण्यात आले.
या दिवाळी किटमध्ये साखर, रवा, मैदा, पोह्यासाठीचे डाळे, चिवडा मसाला, चकली मसाला, मोती साबण, बदाम तेल, खोबरे, चकली पीठ, गोडेतेल, तयार बुंदी, उटणे, पणती पॅकिंग, मका पोहा, स्पेशल पोहा असे एका कुटुंबाला सहज पुरेल असे दर्जेदार दीपावली साहित्याचे किट देण्यात आले.
कार्यकर्त्यांनी गरजू लाभार्थी शोधून त्यांच्यापर्यंत किट पोहोचवले. या लाभार्थींमध्ये कोणाला पती नाही, तर कोणाला मुले नाहीत, कोणाला घर नाही, तर बहुतांश लाभार्थ्यांचे हातावरचे पोट... कोणाचा पती बिछान्यावर औषधोपचार घेत आहे, तर काही ठिकाणी घरात केवळ वृध्द महिला... कामाला जावे तर अंगात ताकद नाही... कोणी अत्यल्पभूधारक तर कोणी भूमिहीन... दारिद्य्राच्या खाईतच दुसर्या संकटांचा सामना करणारी कुटुंबे... काहींचे मोडके तोडके घर, तर काहीजण भाड्याच्या छोट्या खोलीत... काही दिव्यांग... एकूणच सारे उपेक्षित आणि दुर्लक्षित; असे लाभार्थी शोधून त्यांच्यापर्यंत प्रतिष्ठानने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही त्यांच्या दारिद्य्राच्या अंध:काराला तात्पुरत्या स्वरूपात का होईना, बाजूला सारत दीपावलीचा प्रकाश पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. उरूण-इस्लामपूर येथील साठेनगर तसेच नवे बहे, तांबवे, कापूसखेड, नागठाणे अशा ठिकाणी माहिती घेऊन गरजूंना हे किट देण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून हा परिवार आकाराला आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह उद्योजक सर्जेराव यादव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, तसेच इस्लामपूर शहरातील डॉक्टर्स, अभियंते, वकील, प्राध्यापक, उद्योजक आणि समाजभान असणारी अनेक मंडळी या परिवारात सहभागी होत गेली. संयोजनासाठी सर्वसमावेशक कार्यकारिणी असून त्यामध्ये सहायक उपनिरीक्षक संपत वारके, उमेश कुरळपकर, प्रा. डॉ. महेश जोशी, गौतम रायगांधी, उद्योजक विकास राजमाने, दीपक कोठावळे, सतीश सूर्यवंशी, अॅड. विजय काईंगडे, प्रा. नसरीन शेख, अमित यादव, डॉ. विक्रांत पाटील यांचा समावेश आहे.