पलूस : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे कुंडल येथील ऐतिहासिक पार्श्वनाथ डोंगर पुन्हा एकदा हिरवळीने नटला असून, या डोंगरावर निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, डोंगराच्या पर्यटनदृष्ट्या प्रचंड संभाव्यता असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ठळकपणे जाणवत आहे.
पार्श्वनाथ डोंगर हे केवळ जैनधर्मीयांचे धार्मिक श्रद्धास्थान नाही, तर आता ते ट्रेकिंग व पर्यटनासाठी प्रसिद्ध स्थळ ठरत आहे. पहाटेपासूनच डोंगराच्या पायथ्याशी कुंडल, पलूस, किर्लोस्करवाडी, बुर्ली, आमणापूर, दुधोंडी या परिसरातील सर्व डॉक्टर्स युवक, युवती, महिला, वृद्ध यांची उपस्थिती पाहायला मिळते. डोंगरावर पार्श्वनाथ मंदिर असून, तेथून ट्रेकिंगला सुरुवात करणार्यांचा अनुभव आध्यात्मिकतेने भरलेला असतो. या डोंगराच्या कड्यावर ‘कड्याचा मारुती’ नावाचे जागृत देवस्थानही आहे. हे मंदिर एकदम उभ्या कड्यावर असल्याने तेथपर्यंत पोहोचणे कठीण असले, तरीही दर शनिवारी मोठ्या संख्येने भक्तगण दर्शनासाठी येत असतात.
पावसामुळे सध्या डोंगरावर सर्वत्र हिरवळ पसरलेली असून, झाडाझुडपांमध्ये हरणांचे वास्तव्य दिसून येत आहे. ट्रेकिंगसोबतच योग आणि व्यायामाचे महत्त्व या डोंगरावर वाढत आहे. पण अनेक ठिकाणी कुंपणाच्या तारा तुटलेल्या आहेत, त्यामुळे येथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण डोंगर परिसर ट्रेकिंग, साहसी खेळ, पर्यावरण शिक्षण व ग्रामीण पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त असूनही, तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेतृत्व यांच्याकडून या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.