हरिपूर : सांगली ते हरिपूर हा सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता दोन वर्षांहून जास्त काळ झाला तरी अपूर्णच आहे. हा रस्ता काँक्रिटचा केला जात असून त्यावर ‘चिखलकाला’ हा खेळ अगदी मोफत आहे.निंबू मारके, मलई मारके, मस्का लगाके असे आपण खाद्यपदार्थांबाबत अनुभवतो. त्याचप्रमाणे सांगली-हरिपूर काँक्रिट रस्त्यावर साचलेला ‘पाऊस’ भेटतो. सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे आणि चिखलाचा वाहनधारकांना खूप त्रास होतो आहे. वाहने घसरून किती किरकोळ अपघात झाले, याची तर गणतीच नाही.
आता श्रावण सुरू झाला. संगमेश्वर मंदिरासाठी हरिपूर प्रसिद्ध. प्रत्येक श्रावण सोमवारी गावात यात्रा असते. भक्तांचा महापूर असतो. श्रावण महिन्यातील यात्रेची तयारी सुरू असताना, दुसरीकडे हरिपूर-सांगली रस्त्याच्या अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे भाविक आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या कामामुळे यंदाही यात्रेकरूंचे हाल होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील चिखल तरी तातडीने काढावा, अशी मागणी होते आहे. हरिपूर यात्रेसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. रस्ता सिमेंटचा झाल्याने सुंदर दिसत असला तरी, दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मात्र मातीच्या आहेत. अनेकठिकाणी तर रस्त्यापेक्षा साईडपट्ट्यांची उंची मोठी झालेली आहे. तेथील माती रस्त्यावर पसरत आहे.
रस्त्याच्या काही भागामध्ये योग्य उतार न दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. या पाण्याचा लवकर निचराच होत नाही. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी तयार होतात. रस्ता तयार करताना खोदलेली माती आणि मुरूम रस्त्याच्या कडेलाच टाकला. ती पावसामुळे वाहून काँक्रिटच्या रस्त्यावर थेट येते. यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते. अपघातांना निमंत्रण निसरड्या रस्त्यावरून पायी चालणार्यांना आणि वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. दुचाकी घसरून किरकोळ अपघात, हे तर नित्याचेच बनले आहे.
हरिपूर रस्ता केंद्र शासन योजनेनुसार काँक्रिटचा करण्याचे काम सुरू आहे. परंतु जो ठेकेदार राजकीय पुढार्यांनी नेमला आहे त्याचे काम समाधानकारक नाही. एक तर त्यांना वेळ महत्त्वाचा वाटत नाही आणि प्रवाशांची काळजी नाही... बर्याच वेळा दुभाजकाचे, वळण रस्त्याचे फलकच गायब असतात. सजग नागरिक ते आणून जागेवर ठेवतात. उन्हाळा, हिवाळा... काम अजिबात पुढे सरकत नाही. ऐन पावसाळ्यात प्रचंड पावसाने पाणी साचून कामाचा विचका होतो. रस्त्यावरील प्रवाशांचे त्यातल्या त्यात दुचाकीधारकांचे हाल बघण्यासारखे असतात. अनेक अपघात होतात, जीव पणाला लावून जावे लागते. विकास महत्त्वाचा आहे हे खरे असले तरी त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही हे पाहायला पाहिजे. केवळ ठेकेदाराच्या भरवशावर ही कामे सोडली तर अतिशय वाईट प्रकारे रेंगाळतात. त्याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागतात. श्रावण सुरू झाला असताना ही कामे अत्यंत हिरीरीने व्हायला पाहिजे होती, ती होत नाहीत. त्याच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.डॉ. जिज्ञासा दुदगीकर-परांजपे, नागरिक, हरिपूर