‘रब्बी’पेक्षा ऊस लावणीकडे शेतकर्‍यांचा कल 
सांगली

Sangli News : ‘रब्बी’पेक्षा ऊस लावणीकडे शेतकर्‍यांचा कल

कडेगाव तालुक्यातील चित्र : टेंभू, ताकारी सिंचन योजनांच्या पाण्याचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : कडेगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परंतु ताकारी, टेंभू या सिंचन योजनांमुळे तालुक्याला वैभव प्राप्त झाले. शहरासह तालुक्यातील 54 गावांमध्ये ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांचे पाणी खेळू लागले आहे. परिणामी वाढत्या पाणलोट क्षेत्रामुळे तालुक्यातील रब्बी हंगामात मोठी घट होत आहे. रब्बी हंगामापेक्षा पूर्वहंगाम ऊस लावणीकडे शेतकर्‍यांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे.

तालुक्याचे एकूण क्षेत्र 58 हजार हेक्टर क्षेत्र असून 50 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयुक्त आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. परंतु रब्बी पिकांकडे येथील शेतकर्‍यांनी दुर्लक्ष करून पूर्वहंगाम ऊस लावणीकडे अधिक कल दिला आहे, तर रब्बीसाठी हरभरा व ज्वारीला पसंती दिली आहे. तालुक्यात नुकताच खरीप हंगाम संपत आला असून रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी तालुक्यात रब्बी हंगाम कमी प्रमाणात घेतले जाते. मात्र यावर्षी रब्बी पिकाकडे शेतकर्‍यांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र दिसत आहे. ताकारी, टेंभू या सिंचन योजना कार्यान्वित झाल्याने त्याचा लाभ तालुक्याला झाला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चालू वर्षी आडसाली ऊस पिकांची लावण सुमारे 8 ते 10 हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे. आता पूर्वहंगाम उसाची तयारी सुरू आहे. तालुक्यात सरासरी 22 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. मात्र यावर्षी यामध्ये वाढ झाली असून सुमारे 25 हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र जाईल, असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

शेतकर्‍यांनी पूर्व हंगामाच्या उसाच्या लावणीच क्षेत्र वाढवले आहे. यामध्ये को 86032, आठ हजार पाच, दहा हजार एक, 150012 अशा नवनवीन जातींच्या बियाणांचा वापर होत आहे. यामध्ये 10001 या वाणाला पूर्वहंगामाकरिता शेतकर्‍यांनी अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामासाठी तालुक्यातील स्थानिक कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. ऊस पिकाबरोबर भाजीपाला आणि फळबाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुमारे 500 हेक्टर क्षेत्रात भाजीपाला आणि फळबाग करण्यात आली आहे. भाजीपाला आणि फळबाग पिकाबरोबर तालुक्यात हळद आणि आले पीक ही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे.

गहू पिकाकडे शेतकर्‍यांची पाठ

शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे शेतकर्‍यांनी गहू पिकाकडे मागील पाच ते सहा वर्षांत पाठच दाखवली आहे. शासनाकडून मिळत असलेल्या मोफत धान्यामुळे गहू पिकाला मोठा फटाका बसला. गेल्या काही वर्षांची सरासरी काढली असता गहू पेरणीमध्ये मोठी घट झाली आहे. चालू हंगामात तरी गहू पेरणी मोठ्या प्रमाणात होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT