इस्लामपूर : इस्लामपूर येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संभुआप्पा उरूसाला शनिवारपासून उत्साहपूर्ण सुरुवात झाली. आता फकीर होण्याचा विधी 5 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी गंधरात्र (संदल) सोहळा साजरा केला जाणार आहे.
परंपरेनुसार पहिल्या दिवशी मठात मंडप चढविण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात चौधरी भावकीचा मान होता. मठाधिपती मिलिंद पठकरी, आदिनाथ चौधरी, डॉ. चौधरी, सुहास पाटील, यशवंत पाटील तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील उपस्थित होते. 5 नोव्हेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून पौर्णिमेनिमित्त फकीर पूजन होईल. सकाळी शिवलिंग एकतारी भजनी मंडळ, उरुण इस्लामपूर यांच्यावतीने भक्तिसंगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 8 वाजता शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते यांचा पोवाडा कार्यक्रम होईल. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय व मानाचे गलेफ सोहळे होतील, तर रात्री शाहीर देवानंद माळी (सांगली) यांचा पोवाडा रंगणार आहे.
7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता वंदना कांबळे यांचा स्वरांजली हा भावगीत, भक्तिगीत आणि लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमांची माहिती मठाधिपती मिलिंद मटकरी यांनी दिली असून भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.