स्वप्निल पाटील
मिरज : कोल्हापुरात थाटलेल्या बनावट नोटांच्या छापखान्यातून राज्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा वितरित केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. खऱ्याखुऱ्या एका लाखास तीन लाखांच्या बनावट नोटा वितरित केल्या जात असल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे संशयितांकडून कमिशनवर राज्यभरात कोट्यवधी रुपये वितरित केल्याची शक्यता असून याचा तपास केला जात आहे.
बनावट नोटांप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी मुख्य सूत्रधार इब्रार आदम इनामदार, सुप्रीत काडाप्पा देसाई, राहुल राजाराम जाधव, नरेंद्र जगन्नाथ शिंदे आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे या पाचजणांना अटक केली आहे.
कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेला व या प्रकरणात बडतर्फ केलेला पोलिस हवालदार इब्रार इनामदार याची कोल्हापुरात चहाची कंपनी आहे. साधारणत: जानेवारी महिन्यात राहुल जाधव हा इब्रार इनामदार याच्याकडे त्याच्या चहाच्या दुकानाची शाखा घेण्यासाठी गेला होता. त्या भेटीवेळी त्याने इब्रार याला आपल्याकडे बनावट नोटा बनवण्याची शक्कल असून त्यासाठी एका ताकदवान व्यक्तीची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी इब्रार याने हा प्लॅन स्वत:च करण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर दोघांनी अन्य संशयितांनाही सोबत घेतले. संशयितांनी कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमध्ये चहाच्या कंपनीमध्ये बनावट नोटा छापण्याचा कारखाना थाटला. या बनावट नोटांपैकी 42 हजार रुपये कमिशनवर घेऊन विक्रीसाठी मिरजेत आलेला सुप्रीत देसाई हा महात्मा गांधी चौक पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर या सर्व रॅकेटचा पर्दाफाश झाला. मुंबईत बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या कमिशनवर नेण्यासाठी सिद्धेश म्हात्रे हा पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आला होता. त्यावेळी सर्व संशयितांना अटक करत त्यांच्याकडून 98 लाख 43 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्याने साऱ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. छापण्यात आलेल्या सर्व नोटा या एका चहा कंपनीच्या नावाखाली छापल्या जात होत्या. या नोटांचा हा पहिलाच लॉट असल्याचा संशयितांचा दावा आहे. परंतु यापूर्वीही त्यांनी राज्यभरात कमिशन बेसवर नोटा वितरित केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
संशय बळावण्यास कारणही तसेच आहे. कारण मुंबईतील एक व्यक्ती कमिशनवर नोटा नेण्यासाठी आली होती. मग त्यांची ओळख कशी झाली? मुंबईतील संबंधिताने मुंबईत यापूर्वी नोटा वितरित केल्या आहेत का? यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही या बनावट नोटा वितरित झाल्या आहेत का? यादृष्टीनेही तपास केला जात आहे.
जानेवारीत प्लॅन, महिनाभरापूर्वी छापल्या नोटा
संशयित राहुल आणि मुख्य संशयित इब्रार या दोघांची ओळख जानेवारी 2025 मध्ये झाली. तेव्हाच हा प्लॅन आखण्यात आला. परंतु नोटा मात्र महिनाभरापूर्वी छापण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली. परंतु 7-8 महिन्यांत त्यांनी नोटा छापल्याच नाहीत का? अन् छापल्या असतील तर किती छापल्या? त्या कोठे वितरित केल्या? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.