बनावट नोटा रॅकेटचे मुंबई कनेक्शन उघड 
सांगली

Fake currency racket : बनावट नोटा रॅकेटचे मुंबई कनेक्शन उघड

मुंबईत यापूर्वीही नोटांचे वितरण झाले का, याचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

स्वप्निल पाटील

मिरज : कोल्हापुरात छापलेल्या एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन समोर येत आहे. पोलिसांनी अटक केलेला सिद्धेश म्हात्रे (वय 38, रा. रिद्ध गार्डन, मालाड पूर्व, मुंबई) हा अंधेरीत कॉल सेंटरमध्ये काम करीत होता. संशयितांकडून तो वितरित करण्यासाठी 98 लाख 43 हजार रुपये मुंबईला घेऊन जाणार होता. हा त्याचा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले जाते, तेही संशयास्पद आहे. यापूर्वीही बनावट नोटा मुंबईत नेल्या का? त्या चलनात आणल्या का, याचाही तपास केला जात आहे. यामुळे आता मुंबई पोलीसही सतर्क झाले आहेत.

कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीमध्ये चहा कंपनीच्या नावाखाली नुकताच बडतर्फ केलेला पोलीस हवालदार इब्रार इनामदार याने बनावट नोटांचा छापखानाच थाटला होता. मिरजेत बनावट नोटा कमिशनवर देण्यासाठी आलेला सुप्रीत देसाई हा पोलिसांच्या हाती लागला व त्याचा भांडाफोड झाला. अटक करण्यात आलेल्या पाचजणांकडून त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले जाते; परंतु मिरजेत बनावट नोटा वितरित करण्याचा प्रयत्न, त्यानंतर अंधेरीमधील कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या म्हात्रे याला तब्बल 98 लाखांच्या बनावट लाखांच्या नोटा देण्याचा प्रयत्न, हा पहिलाच प्रयत्न कसा असू शकतो? त्यामुळे ‘पहिला प्रयत्न’ म्हणणे हे संशयाच्या भोवर्‍यात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन पोलिस तपास करीत आहेत.

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी पाचजणांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. पाचहीजण मूग गिळून गप्प असल्याने नोटा राज्यभरात वितरित झाल्या की नाही? याबाबत तपास सुरू आहे. या पाचजणांना पोलिस लवकरच ‘बोलते’ करतील, अशी अपेक्षा आहे.आता कोल्हापुरातील बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन समोर आल्याने मुंबईत यापूर्वी बनावट नोटा कमिशनवर खपविल्या नाहीत, यावर विश्वास ठेवण्यास पोलिस तयार नाहीत. परिणामी राज्यभरातील तपास यंत्रणांना ऐन सणासुदीच्या आर्थिक उलाढाल वाढलेल्या दिवसांमध्ये सतर्क व्हावेच लागले आहे. संशयित सहा महिन्यांपासून बनावट नोटा तयार करण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना 97 टक्के हुबेहूब यश आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नोटा निर्मितीसाठी वापरलेल्या कागदाच्या गुणवत्तेमुळे ‘तीन टक्के ’ शंकेला वाव राहिला. नाही तर पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा हुबेहूब असल्याने कोणासही शंका येणार नाही, याची या संशयितांनी खूपच दक्षता घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवरही पकडलेल्या संशयितांकडून यापूर्वी खपविलेल्या नोटांवर पडदा टाकण्यासाठी हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले जाते, हे गंभीर आहे. मुंबईत बनावट नोटा खपविण्यासाठी आलेला सिद्धेश म्हात्रे हा ट्रायल बेसवर इतकी मोठी रक्कम नेईलच कशी? अशी शंकाही उपस्थित होते. याचे कारण त्याला जर ट्रायल बेसवर नोटा खपवायच्या होत्या, तर त्या काही हजारात, फार फार तर काही लाखात खपविल्या असत्या, पण म्हात्रे हा मुंबईकडे 98 लाख 43 हजार रुपये नेणार होता. मग हा त्याचा पहिला प्रयत्न कसा असू शकतो? यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाचजणांच्या संपर्कातील संशयित रडारवर

अटकेतील पाचजणांच्या संपर्कात अन्य कोण-कोण होते, याचा शोध मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सुरू आहे. परंतु पाचही जणांनी रॅकेटबाबतीत तोंड उघडलेले नाही. त्यामुळे त्यांचे सीडीआर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे पाचजणांच्या संपर्कात असणारे आणखी मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून गंभीर दखल

तब्बल कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयानेही याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय सातत्याने सांगली पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात आहे.

मुंबईतील गुन्हे शाखाही सतर्क

कोल्हापुरातील बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन समोर आल्यामुळे मुंबईतील गुन्हे शाखांकडूनही मुंबईत हालचाली गतिमान झाल्या आहेत. यापूर्वी मुंबईत कोठे-कोठे बनावट नोटा खपविल्या असू शकतात, याचा तपास केला जात आहे.

इब्रारच्या करामतीने ‘खाकी’च्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह

इब्रार इनामदार हा कोल्हापूर मोटार परिवहनमध्ये हवालदार पदावर असतानाही तो बनावट नोटा छापण्याचे रॅकेट चालवत होता. सहा महिन्यांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. पदावर असताना तो सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या या करामतीने राज्यभरातील ‘खाकी’च्या प्रतिमेविषयी समाजमाध्यमात प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT