सांगली : सिव्हिल हॉस्पिटल ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. मात्र तो अरुंद आहे. त्यात भर म्हणून दोन्ही बाजूंनी रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. दुकानांसमोरील वाहने आणि जाहिरात फलकाच्या स्टॅन्डी रस्त्यावरच असतात. त्यामुळे रस्ता आणखी अरूंद झाला आहे. या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. धोकादायक बनलेल्या या रस्त्याने गुरुवारी एका विद्यार्थिनीचा बळी घेतला. महापालिका व वाहतूक नियंत्रण शाखेने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
खोकी, हातगाडे, दुकाने यांच्या अतिक्रमणांमुळे शहरातील अनेक रस्ते अरूंद झाले आहेत. धोकादायक बनले आहेत. त्रिकोणी बाग - सिव्हिल हॉस्पिटल ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता त्यापैकीच एक. या रस्त्यावर नेहमीच प्रचंड वर्दळ असते. वाहनांची रहदारी सतत असते. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नेहमीचीच बाब झालेली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा पट्टा मारलेला आहे. मात्र या पट्ट्याच्या बाहेर दुचाकी, चारचाकी वाहनेही उभी केलेली असतात. दुकानांसमोरील जाहिरातींचे फलकही पांढरा पट्टा ओलांडून रस्त्यावर ठेवलेले असतात. त्यामुळे हा आणखी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल चौकात ‘नो पार्किंग’ फलकाखालीच वाहनांचे पार्किंग केलेले असते. याठिकाणचा फूटपाथ अतिक्रमणांसाठीच राखून ठेवला आहे की काय, अशी स्थिती आहे. एकूणच अतिक्रमण, रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वाहने, अरुंद रस्ता आणि अशा स्थितीत प्रचंड वर्दळ, रहदारी यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. महापालिकेने तसेच पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवणे तसेच वाहतुकीस शिस्त लावण्याची गरज आहे. झुलेलाल चौकात हातगाड्या आणि वडाप रिक्षा रस्त्यावरच उभ्या असतात. याठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. हे क्षेत्र अपघातप्रवण बनले आहे. इथे शिस्त आणल्यास किमान आणखी पंधरा फूट रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. येथील वाहतूक सुरळीत होऊ शकते.
स्टँड रोडवर वाहनांची मोठी रहदारी असते. ती कमी करण्यासाठी वाहतूक नियमन होणे गरजेचे आहे. बसेस तसेच अवजड वाहनांची वाहतूक शंभरफुटीमार्गे झाल्यास स्टँड रोडची रहदारी कमी होईल. वाहतूक नियंत्रण शाखेने त्याअनुषंगाने उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.