कासेगाव : अण्णा भाऊ साठे यांनी कधीही जाती-पातीचा विचार केला नाही. ते नेहमी जातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन शेवटपर्यंत जगले. त्यांना जातीत अडकवणे बरोबर नाही. वाटेगाव येथे त्यांचे अद्ययावत स्मारक उभारण्यासाठी राज्य पातळीवर समिती करून प्रयत्न करू, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त वाटेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकात आयोजित कॉम्रेड अण्णा भाऊ साठे विचार मंथन परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक काही कोटी रुपये खर्च करून सरकार उभे करत आहे. त्याचे स्वागत करून, हे स्मारक अण्णा भाऊ यांना साजेसे, त्यांच्या साहित्याचे, कथांचे, गाण्यांचे, पोवाड्यांचे, ते ज्या समाजात जन्माला आले, त्या समाजाचे दर्शन घडवणारे असावे.
शाहीर सदाशिव निकम व शाहीर रफिक पटेल यांनी सादर केलेल्या अण्णा भाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष रवींद्र बर्डे म्हणाले, प्रस्थापित व्यवस्थेवर घणाघाती हल्ला करून सामान्य जनतेचा आवाज लोकशाहीर अण्णा भाऊ यांनी बुलंद केला. सुभाष लांडे म्हणाले, ज्यांनी आमच्या महापुरुषांचा व्यक्तिशः विरोध केला, त्यांच्या साहित्याला विरोध केला, तेच आता त्यांचा उदोउदो करत आहेत. ते जिवंत असताना त्यांच्या साहित्यावर बंदी घातली गेली. आज कळवळा आणून, आपण काही तरी करीत असल्याचा आव आणला जात आहे. त्यामध्ये त्यांचा डाव आहे, हे ओळखले पाहिजे.
अतुल दिघे म्हणाले, संविधान वाचविण्यासाठी चळवळ करणार्या लोकांना तुरुंगात टाकण्याची भाषा सरकार करत आहे. अण्णा भाऊ साठे हे जनतेच्या बाजूने, जनतेची दुःखे मांडणारे एकमेव साहित्यिक होते. अच्युत माने यांनी, अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबर्या व गाणी याच्याशी सामान्य जनतेचा कसा संबंध आहे, हे समजावून सांगितले. लक्ष्मण माने म्हणाले, सध्या सत्तेवर असलेले राज्यकर्ते हे इंग्रजांपेक्षा वाईट आहेत. इंग्रजांनी फोडा-झोडा नीतीचा वापर करून राज्य केले, त्याच नीतीचा अवलंब सध्याचे राज्यकर्ते खुर्चीसाठी करत आहेत. डॉ. शरद गायकवाड म्हणाले, काळ फार कठीण आहे, महापुरुषांना चोरले जात आहे. त्यांना जाती-जातीत वाटले जात आहे. धम्मसंगिनी रमा गोरख, राम बाहेती यांचीही भाषणे झाली. धनाजी गुरव यांनी ठरावाची मांडणी केली. यावेळी दिगंबर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. जयंत निकम यांनी प्रास्ताविक केले, मिलिंद पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले, योगेश साठे यांनी आभार मानले.