पलूस : अतिवृष्टी आणि पुरामुळे पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा निर्णय तत्काळ घेतला. सरकार शेतकर्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेतर्फे पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगाव, राडेवाडी, बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे सुखवाडी, अंकलखोप या गावांना यांत्रिकी बोटींचा लोकार्पण सोहळा औदुंबर (ता. पलूस) येथे सोमवारी झाला, यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पलूस तालुका पूर्वी अतिवृष्टीग्रस्त यादीत नव्हता, पण आता या तालुक्याचा समावेशही या यादीत केला गेला आहे. राज्यातील शेतकर्यांना एकूण 41 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. सुमारे 65 लाख हेक्टर शेतीचे नुकसान भरून काढण्याचे काम चालू आहे. पूरस्थिती कायमस्वरूपी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. नदीकाठच्या भागात भविष्यात पूर टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, 100 वर्षांनंतर, 2005 साली कृष्णा नदीला महापूर आला. तेव्हा माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी भरीव मदत करून लोकांचे जीवनमान उंचावले. मात्र त्यानंतर एवढा महापूर येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. 2019 साली पुन्हा महापुरामुळे कृष्णाकाठावर मोठे संकट उभे राहिले. त्या काळात रात्रं-दिवस काम करून ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जेणेकरून सर्व नागरिक सुरक्षित राहू शकतील. महापुरानंतर गावातील स्वच्छता आमच्या कार्यकर्त्यांनी केली. 2021 मध्ये पुन्हा महापूर आला. ज्यावेळी संरक्षणासाठी अमेरिकन बोटींचे (9 बोटी) नियोजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी येणार्या काळात घाट बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यास सहकार्य करावे.
खासदार विशाल पाटील म्हणाले, 2005 आणि 2019 साली कृष्णेला आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे जीवन संकटात आले. 2005 साली माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी फार मोठी मदत केली. 2019 च्या महापुरात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जबाबदारी घेत महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना धीर देण्याचे काम केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी राजेश कदम आदी उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.
चंद्रकांत पाटील हसत हसत म्हणाले की, डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे मला ‘पालकमंत्री म्हणून लक्ष द्या’ असे वारंवार सांगतात. कदाचित त्यांचाही आमच्यात येण्याचा विचार असावा.