वारणावती : चांदोली-शेडगेवाडी मार्गाचे रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडण्यात येणार्या हजारो झाडांचे आता संवर्धन होणार आहे. अडथळा ठरणारी नाममात्र झाडे तोडली जाणार आहेत. झाडे वाचवून रुंदीकरण करा अन्यथा आंदोलन करू, या निसर्गप्रेमींच्या मागणीला यश आले असून चांदोलीचे सौंदर्य आता अबाधित राहणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमधून आनंदाचे वातावरण आहे.
जैवविविधतेने समृद्ध असलेला चांदोली अभयारण्य परिसर निसर्गरम्य आहे. सध्या सुरू असलेल्या विकास प्रक्रियेचा जैवविविधतेवर परिणाम होणार होता. रस्ता रुंदीकरण होत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी शेकडो झाडे तोडली जाणार होती. यामध्ये शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाची बरीच झाडे आहेत. चांदोली अभयारण्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता वृक्षतोड न करता रुंद करण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत होती. तोडण्यात येणार्या झाडावर ‘प्लॅनेट अर्थ फाऊंडेशन’ या संस्थेने शेकरू, ग्रेट हॉर्न बिल, स्वर्गीय नर्तक, गरुड, हळद्या, घुबड हे पक्षी आणि अजगर, नाग, घोरपड, हरणटोळ यासारखे साप यांचा अधिवास नोंद केला आहे.
हा मार्ग ग्रामीण भागातून जातो आणि पुढे कोणत्याही मोठ्या शहरास जोडत नसल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक आणि रहदारी कमी आहे. हा रस्ता दहा मीटर रुंदीचा होणार आहे. उरलेल्या दोन मीटरमध्ये साईडपट्टी असणार आहे. जिल्ह्यात झालेल्या आतापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा अभ्यास केल्यास असे आढळून आले आहे की, वृक्षतोड करून रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर पुन्हा झाडे लावताना ही झाडे जुन्या तोडलेल्या झाडाच्या जागेवर लावावी लागतात. शेतकरी अथवा खासगी जमीन मालक आपल्या जागेत झाडे लावून देत नाहीत अथवा लावलेली झाडे उपटून टाकतात. बर्याच रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर वृक्षारोपण हे साईडपट्टीत करण्यात आले आहे. त्यामुळे चांदोली अभयारण्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता वृक्षतोड न करता रुंद करण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमीकडून होत होती. प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी, यासाठी आंदोलन करण्याचा इशारा शिराळा तालुक्यातील सर्व वृक्षप्रेमींनी दिला होता. वृक्षप्रेमींच्या या मागणीला आता यश आले आहे. अडथळा करणारी केवळ 221 झाडे तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
चांदोली हे पर्यटनस्थळ आहे. चांदोली धरण, चांदोली अभयारण्य, गुढे पाचगणी, झोळंबी व उदगीरीचे पठार ही या ठिकाणची महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे दररोज अनेक पर्यटकांचा ओढा चांदोलीकडे असतो. शिवाय या वृक्षसंपदेमुळे चांदोलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. झाडे तोडल्यामुळे हे सौंदर्य भकास झाले असते. ही बाब लक्षात घेऊन निसर्गप्रेमींनी केलेला विरोध आणि प्रशासनाने घेतलेली दखल, यामुळे चांदोली मार्गावरील सौंदर्य आता अबाधित राहील.